चपळगाव : मागील महिन्यात कुरनुर धरण कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार अखेर बुधवारी दुपारी कुरनूर धरणातूनपाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
धरणाचे तीन दरवाजे उघडण्यात आले असून त्यातून प्रतिसेकंद १२०० क्युसेकने पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती संबंधित प्रशासनाकडून देण्यात आली.
मागील हंगामात झालेल्या अत्यल्प पावसामुळे अक्कलकोट तालुक्यात सध्या उन्हाळ्यापूर्वीच काही गावांत दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.
या पार्श्वभूमीवर धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे अक्कलकोट तालुक्याच्या दक्षिण भागातील काही गावांना त्याचा खूप मोठा फायदा होणार आहे.
त्यामध्ये प्रामुख्याने तीन नगरपालिका आणि जवळपास २० ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठ्चाचा प्रश्न उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर मिटण्यासाठी मोठी मदत होणार आहे.
दरम्यान आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत धरणातून पाणी सोडण्यासंदर्भात संबंधित प्रशासनाला निर्देश दिले होते. अक्कलकोटच्या दक्षिण भागातील जनता आणि मुक्या प्राण्यांची हेळसांड होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता.
कुरनूर धरणाखालील बोरी नदीत हे पाणी सोडण्यात आले असूना नदीवरील आठ बंधारे भरून घेण्यात येणार असल्याची माहिती संबंधिता प्रशासनाकडून देण्यात आली. आठही बंधारे भरल्यानंतर धरणातील विसर्ग बंद करण्यात येणार आहे.
सद्य:स्थितीत एकरूख योजनेच्या माध्यमातून कुरनुर धरणात हरणा नदीद्वारे पाणी मिसळत आहे. तर कुरनूर धरणातून अक्कलकोट तालुक्याच्या दक्षिण भागासाठी पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे उत्तर व दक्षिण भागातील जनतेमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.
अधिक वाचा: Ujani Dam Water Level : मागील वर्षी मायनसमध्ये असणाऱ्या उजनी धरणात यंदा किती पाणीसाठा? वाचा सविस्तर