Join us

शेतकऱ्यांपुढं नवं संकट! महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात अवकाळीसोबत गारपिटीची शक्यता

By गोकुळ पवार | Published: November 24, 2023 6:27 PM

Weather Report : एकीकडे ढगाळ हवामान आणि पावसाची शक्यता (Unseasonal Rain) असताना नवीन संकट शेतकऱ्यांपुढे येऊन ठाकले आहे. ते ...

Weather Report : एकीकडे ढगाळ हवामान आणि पावसाची शक्यता (Unseasonal Rain) असताना नवीन संकट शेतकऱ्यांपुढे येऊन ठाकले आहे. ते म्हणजे 23 ते 27 नोव्हेंबरच्या कालावधीत गारपीट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याबाबत जेष्ठ निवृत्त हवामान तज्ञ माणिकराव खुळे (Manikrao Khule) यांनी सविस्तर माहिती दिली आहे. त्यानुसार येत्या दोन ते तीन दिवसांत गारपीट होण्याची संभावना आहे. 

आज सकाळपासून महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात ढगाळ हवामान (Cloudy Weather) पाहायला मिळाले. जेष्ठ निवृत्त हवामानशास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार आजपासून 27 नोव्हेंबरपर्यंत महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात ढगाळ हवामानासह अवकाळी पाऊस होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आलं आहे. त्याचबरोबर काही भागात गारपिटीची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे एकीकडे रब्बीचा हंगाम (Rabbi Season) सुरु झाला असताना, रब्बीची पेरणी सुरु झाली असताना अवकाळी पाऊस, अथवा गारपीट झाल्यास शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला समोरे जावे लागण्याची शक्यता आहे. रब्बी हंगामच वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. 

दरम्यान 23 ते 27 नोव्हेंबर दरम्यानच्या पाच दिवसीय पावसाळी वातावरणापैकी रविवार व सोमवार म्हणजेच 26 आणि 27 नोव्हेंबरला नंदुरबार, धुळे, जळगांव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पावसाची तीव्रता अधिक आहे. तसेच या भागात तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. बुधवारी 29 नोव्हेंबरपासून वातावरण निवळून त्यापुढील तीन आठवड्यापर्यंत दुपारच्या कमाल तापमानात घट जाणवून दिवसाचा ऊबदारपणा कमी होवून दिवसाही काहीसा गारवा जाणवू शकतो. तर शुक्रवार 8 डिसेंबरपासून किमान तापमानताही हळूहळू घसरण होवून थंडीला सुरवात होवु शकते,  अशी शक्यता खुळे यांनी व्यक्त केली आहे.              गारपीटीची शक्यता का निर्माण झाली? 

गारपीटीचा काळ साधारण 26 जानेवारी ते 15 मार्चपर्यंत जाणवतो. तरीदेखील खालील प्रणाल्यामुळेवर स्पष्टीत पाच जिल्ह्यात 2 दिवस तुरळक ठिकाणी गारपीटीची शक्यता निर्माण झाली आहे. अरबी समुद्रात मालदीव ते उत्तर महाराष्ट्र पर्यन्त पश्चिम किनारपट्टी समांतर पृष्ठभागापासून दिड किमी. उंचीच्या जाडीचा हवेच्या कमी दाबाच्या 'आस' निर्मिती मुळे वायव्य उत्तर भारतातुन थेट मध्यप्रदेश, गुजरातमधून उत्तर महाराष्ट्रापर्यंत तसेच तेथून दक्षिण कोकण किनारपट्टीसमोर अरबी समुद्रात सहा किमी. उंचीच्या वर निर्मित हवेच्या कमी दाबाच्या आसमुळे येऊ घातलेल्या पश्चिमी झंजावाताचा परिणामामुळे तामिळनाडू, केरळ भू -भाग ओलांडून दिड ते दोन किमी. उंचीपर्यंतची 'पुरवी' वारा प्रणाली अरबी समुद्रात उतरून विकसित होवून महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टी समांतर उत्तरेकडे आगेकूच करूनवरील पश्चिमी झंजावात प्रणालीत होणाऱ्या विलीनिकरणामुळे दोन प्रणाल्यांच्या संयोगातून गारपीटीची शक्यता वाढली आहे. 

 

टॅग्स :हवामाननाशिकपाऊसशेती