Join us

Dam Storage : नाशिक जिल्ह्यातील धरणांत केवळ 20 टक्के पाणीसाठा शिल्लक, कुठे-किती पाणी? 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2024 1:54 PM

राज्यातील अनेक धरणांनी तळ गाठला असून धरणात खूपच कमी पाणीसाठा शिल्लक असल्याचे चित्र आहे.

राज्यात अवकाळी पाऊस जरी बरसत असला तरीही पाणी टंचाई मात्र जैसे थे आहे. राज्यातील अनेक धरणांनी तळ गाठला असून धरणात खूपच कमी पाणीसाठा शिल्लक असल्याचे चित्र आहे. नाशिक जिल्ह्यातही अशीच काहीशी परिस्थिती असून आजमितीला गंगापूर धरणात 33. 45 टक्के पाणी शिल्लक राहिले आहे. तर जिल्ह्यातील धरणांमध्ये 20 टक्के पाणीसाठा शिल्लक राहीला आहे. 

सद्यस्थितीत राज्यातील सर्वच धरणातील पाणीसाठा चिंताजनक असून जायकवाडी धरण सात टक्क्यांवर आले आहे. त्याचबरोबर लहान मोठ्या धरणांत अल्पसा पाणीसाठा शिल्लक असल्याचे चित्र आहे. एकीकडे राज्यभर अवकाळी पाऊस धुमाकूळ घालत आहे, अद्यापही मान्सून सुरु होण्यासाठी काही कालावधी असताना गेल्या काही दिवसांपासून नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. नाशिक जिल्ह्यातील धरणात यंदा पाणीसाठ्याची विदारक परिस्थिती असून मागील वर्षी 36 टक्क्यांवर असणारा जलसाठा 20 टक्क्यांवर आला आहे. 

जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार आजमितीस गंगापूर धरण समूहात 33. 45 टक्के पाणी आहे. मागील वर्षी हाच साठा 49. 31 टक्के होता. कश्यपी धरणात 23.70 टक्के, गौतमी गोदावरी धरणात 16.22 टक्के, पालखेड धरण समूहातील पालखेड धरणात 09.04 टक्के, करंजवण धरणात 14.88 टक्के, वाघाड धरणात केवळ 3.91 टक्के पाणी शिल्लक राहिला आहे. ओझरखेड धरणात 0 टक्के, पुणे गाव धरणात 00 टक्के तिसगाव धरणात 0.22 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.

कुठे किती पाणी शिल्लक ? 

तसेच दारणा धरणात 24.76 टक्के, भावली धरणात 05.09 टक्के, मुकणे धरणात 21.92 टक्के, नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यात 91.05 टक्के उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे. गिरणा खोरे धरून समूहातील चणकापूर धरणात 13.60 टक्के हरणबारी धरणात 30.62 टक्के, केळझर धरणात 08.39 टक्के तर नागासाक्या धरणात 00 टक्के तर गिरणा धरणात 21.29 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. एकूणच मागील वर्षी याच दिवशी नाशिक जिल्ह्यातील धरणांत 36.67 टक्के पाणीसाठा होता, तर आजमितीला केवळ 20.20 टक्के असा चिंताजनक पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.

 

टॅग्स :नाशिकशेतीपाणीगंगापूर धरण