यंदा पाणीटंचाईच्या झळा सर्वदूर असून नाशिक जिल्ह्यात देखील बिकट परिस्थिती आहे. विहिरींचे पाणी आटत चालले असून अनेक नद्या कोरड्याठाक झाल्या आहेत. अशा स्थितीत नाशिक जिल्ह्यातील धरणांत देखील कमी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. जिल्ह्यातील 24 प्रकल्प मिळून केवळ 29 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे अजूनही दोन महिने उन्हाळ्याचे असताना आताच पाणीसाठा तळाला गेल्याने पुढील काही दिवसांत भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
नाशिक जिल्ह्यात एकूण 24 प्रकल्पातून दरवर्षी पेक्षा यंदा मात्र सर्व दूर पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. अनेक भागात पाण्याचे स्रोत कमी झाल्याने पिके देखील वाळू लागले आहेत, अशा स्थितीत पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. आजमितीला जिल्ह्यातील धरणांमध्ये केवळ 29 टक्के जलसाठा शिल्लक आहे. त्यात महत्त्वाचं असलेल्या गंगापूर धरणात केवळ 46 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मागच्या वर्षीचा विचार केला तर जवळपास 55 टक्के जलसाठा उपलब्ध होता.
असा आहे धरणसाठा
जिल्ह्यातील धरण साठा पाहायला गेलं तर गंगापूर धरणात 46 टक्के, कश्यपी 44 टक्के, गौतमी गोदावरी 36 टक्के, पालखेड 52 टक्के, ओझरखेड 16 टक्के, पुणेगाव शून्य टक्के, दारणा 24 टक्के, भावली 13 टक्के, मुकणे 30 टक्के, वालदेवी 20 टक्के, नांदूर मध्यमेश्वर 89 टक्के, चणकापुर 23 टक्के हरणबारी 38 टक्के, केळझर 17 टक्के, गिरणा 31 टक्के तर माणिकपुंज 10 टक्के अशी काही महत्त्वाची धरण मिळून 29 टक्के असा जलसाठा उपलब्ध आहे.