Lokmat Agro >हवामान > Girana Dam : गिरणा धरणाच्या ५५ वर्षांच्या इतिहासात एकदाही सर्व दरवाजे उघडण्यात आले नाही, वाचा सविस्तर 

Girana Dam : गिरणा धरणाच्या ५५ वर्षांच्या इतिहासात एकदाही सर्व दरवाजे उघडण्यात आले नाही, वाचा सविस्तर 

Latest News 55 years history of Girana Dam, all 14 gates not opened for water discharged see history | Girana Dam : गिरणा धरणाच्या ५५ वर्षांच्या इतिहासात एकदाही सर्व दरवाजे उघडण्यात आले नाही, वाचा सविस्तर 

Girana Dam : गिरणा धरणाच्या ५५ वर्षांच्या इतिहासात एकदाही सर्व दरवाजे उघडण्यात आले नाही, वाचा सविस्तर 

Girana Dam : उत्तर महाराष्ट्रातील गंगापूर धरणानंतर मोठा जलप्रकल्प म्हणून गिरणा धरणाचा उल्लेख होतो.

Girana Dam : उत्तर महाराष्ट्रातील गंगापूर धरणानंतर मोठा जलप्रकल्प म्हणून गिरणा धरणाचा उल्लेख होतो.

शेअर :

Join us
Join usNext

- जिजाबराव वाघ 

जळगाव : गिरणा धरणाच्या ५५ वर्षांच्या इतिहासात ते पूर्ण भरुन विसर्गासाठी धरणाचे सर्वच्या सर्व १४ दरवाजे उघडावे लागण्याची वेळ आतापर्यंत एकदाही आलेली नाही. गिरणा धरण ओव्हरफ्लो झाल्यानंतर त्याचे किती दरवाजे उघडले जातात, या विषयी सर्वसामान्य नागरिकांना नेहमीचं औत्सुक असते. गिरणा धरणाची पाणी विसर्ग करण्याची क्षमता २ लाख ९५ हजार क्यूसेक आहे. १९६९ मध्ये पहिल्यांदा २ लाख २५ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. मात्र, तेव्हाही धरणाचे सर्व १४ दरवाजे उघडण्यात आले नव्हते. २८ रोजी धरण ९२ टक्के भरल्यानंतर एक ते ६ क्रमांकाचे दरवाजे उघडले गेले. शुक्रवारीही १ ते ६ क्रमांकाचे दरवाजे ३० सेमी उघडून १०५४ क्युसेक पिण्याचा विसर्ग केला जात आहे.

उत्तर महाराष्ट्रातील गंगापूर धरणानंतर मोठा जलप्रकल्प म्हणून गिरणा धरणाचा उल्लेख होतो. गिरणा धरणाच्या कामासाठी १९५५ मध्ये कुदळ मारली गेली. प्रत्यक्ष बांधकाम १९५९ मध्ये सुरू झाले. १ हजार ४०० फूट दगडी तर १ हजार ७६० फुट मातीचे बांधकाम असून, १३ कोटी रुपयांमध्ये धरण बांधून झाले. १९६९ मध्ये गिरणा धरणाचे लोकार्पण झाले आहे. २०१९ मध्ये या धरणाने सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण केले होते. १९७३ मध्ये हे धरण पहिल्यांदा शंभर टक्के भरले. गत ५५ वर्षांत १४ वेळा धरणाने सेंच्युरी ठोकली आहे. 

गेल्या वर्षी धरण फक्त ५६ टक्के भरले होते. धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता २१ हजार ५०० दलघफू असून, मृतसाठा ३ हजार दलघफू इतका आहे. गिरणा धरणातून चाळीसगावसह मालेगाव शहर, नांदगाव तालुका यासोबतच जळगाव जिल्ह्यातील १२७ पाणीपुरवठा योजनांसाठी पाणी सोडले जाते. सिंचनासाठी तीन आवर्तने दिली जातात. चाळीसगाव व मालेगाव औद्योगिक वसाहतीची चाकेही गिरणा धरणाच्या पाण्यावर फिरतात. पेयजलासाठी गिरणा धरणाचे पाणी दहिगाव बंधाऱ्यापर्यंत प्रवास करते.


२७ रोजी धरणात ९२ टक्के जलसाठा झाल्यानंतर पाण्याचा विसर्ग करण्यासाठी १ ते ६ दरवाजे उघडण्यात आले. पाण्याची आवक लक्षात घेऊन दरवाजे किती उघडायचे, याचा निर्णय घेतला जातो. धरणाला एकूण १४ दरवाजे आहेत. - विजय जाधव, उपअभियंता गिरणा पाटबंधारे विभाग, चाळीसगाव, 

सतर्कतेसाठी दवंडी, वायरलेस यंत्रणाही 
सद्यस्थितीत सर्व सुविधा डिजिटल झाल्या आहेत. मात्र, काही वर्षांपूर्वी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा तहसीलदारांमार्फत दिला जायचा. गावागावात हे काम महसूल यंत्रणेतील शेवटचा घटक असणारा पोलिस पाटील करायचा. धरणातून पाणी सोडल्यास गावागावात दवंडी देऊन नागरिकांना सावधान केले जायचे. गिरणा पाटबंधारे विभागात वरिष्ठांना पाण्याबाबत माहिती देण्यासाठी वायरलेस यंत्रणाही होती. नंतर २००४ पासून दरवाजे उघडण्यासाठी इलेक्ट्रिक यंत्रणाः पाण्याचा विसर्ग करण्यासाठी २००४ इलेक्ट्रिक यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. यापूर्वी मोटारीसह हाताने हॅन्डल फिरवून धरणाचे दरवाजे उघडले जायचे. जनरेटरचीही व्यवस्था आहे, अशी माहिती गिरणा पाटबंधारे विभागाचे निवृत्त उपअभियंता हेमंत पाटील यांनी दिली.

पाणी सोडण्याबाबत कार्यकारी अभियंता घेतात निर्णय 
साधारणतः धरण ९२ टक्के भरल्यानंतर पाण्याची आवक लक्षात घेऊन गिरणा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता धरणातून पाणी सोडण्याबाबत निर्णय घेतात. पाण्याचा विसर्ग करण्यासाठी प्रथम १ ते ६ दरवाजे उघडण्यात येतात. पाण्याची आवक वेगाने होत असल्यास उर्वरित दरवाजे उघडण्याची प्रक्रिया केली जाते. मात्र, गेल्या ५५ वर्षांत हे धरण फक्त १४ वेळा भरले. त्यामुळे पूर्ण १४ दरवाजे अद्यापपर्यंत उघडले गेले नाही. २ लाख ९५ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करावयाचा असेल, १४ दरवाजे लागतात. गत ५५ वर्षात १९६९ मध्येच २ लाख २५ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग गिरणा धरणातून केला गेला आहे. मात्र, तेव्हाही १० दरवाजे उघडले गेले होते.
 

Web Title: Latest News 55 years history of Girana Dam, all 14 gates not opened for water discharged see history

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.