Join us

Nashik : नाशिक जिल्ह्यातील धरणसाठ्याची स्थिती काय? कोणत्या धरणात किती पाणी उपलब्ध? 

By गोकुळ पवार | Published: November 28, 2023 3:39 PM

Nashik : गंगापूर धरणात 84 टक्के पाणी साठा उपलब्ध असून जिल्ह्यातील लहान मोठ्या एकूण 24  प्रकल्पात 77 टक्के पाणी शिल्लक आहे.

Nashik : नाशिक जिल्ह्यातील बहुतांश भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. दुसरीकडे जायकवाडी साठी देखील गंगापूर सह दारणा आणि मुकणे धरणातून पाणी सोडण्यात आले. त्यामुळे सद्यस्थितीत गंगापूर धरणात 84 टक्के पाणी साठा उपलब्ध असून जिल्ह्यातील लहान मोठ्या एकूण 24  प्रकल्पात 77  टक्के पाणी शिल्लक आहे. मागील हाच जलसाठा 98 टक्के होता. यंदा मात्र पाणी कमीच असल्याचे सांगण्यात येत आहे. 

एकीकडे ऐन हिवाळ्यात अवकाळी पावसाने संपूर्ण राज्याला झोडपून काढले. त्यामुळे अनेक भागात शेती पिकांचे नुकसान झाले. तर दुसरीकडे यंदा नाशिक जिल्ह्यात अत्यल्प पाऊस असल्याने धरणांची स्थिती समाधानकारक आहे. मात्र असे असताना समन्यायी वाटपाच्या करारानुसार जायकवाडीसाठी देखील पाणी सोडण्यात आले. गंगापूर धरणासह, मुकणे आणि दारणा धरणातून हे पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे आता नाशिक जिल्ह्यावर पाणी टंचाईची टांगती तलवार आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील 24  प्रकल्पामध्ये 77 टक्के पाणी साठा उपलब्ध आहे. तर गंगापूर धरणात 84 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तर दारणा धारांत 82 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.  

दरम्यान यंदा जिल्ह्यात पाऊस कमी असल्याने अनेक धरणांमध्ये साजेसा पाणीसाठा नाही. त्यामुळे अनेक भागात आजही पाणी टंचाई सुरु आहे. त्यामुळे जिल्ह्यातील धरणात उपलब्ध पाणीसाठ्यात आगामी पावसाळ्यापर्यत गुजराण करणे आवश्यक झाले आहे. त्यातच आता जायकवाडी धरणासाठी नाशिक- नगर जिल्ह्यातून 8 टीएमसी पाणी सोडण्यात आले. त्यामुळे नाशिककरांना देखील पाणी जपून वापरावे लागणार आहे. जेणेकरून आगामी काळात पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार नाही. 

नाशिक जिल्ह्यातील धरणसाठ्याची स्थिती

नाशिक जिल्ह्यातील धरणांची स्थिती पाहिल्यास गंगापूर 84 टक्के, कश्यपी 99 टक्के, गौतमी गोदावरी 96 टक्के, आळंदी 90 टक्के, पालखेड 33 टक्के, दारणा 82 टक्के, मुकणे 86 टक्के, वालदेवी 95 टक्के, नांदूरमध्यमेश्वर 50 टक्के, हरमबारी 97 टक्के, पुनद 100 टक्के असा पाणी साठा उपलब्ध आहे.

टॅग्स :नाशिकगंगापूर धरणपाणीकपात