नाशिक : सध्या राज्यातील बहुतांश भागात मान्सूनचे (Monsoon) आगमन झाले असून अजून जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत अवघा महाराष्ट्र आहे. अद्यापही अनेक ठिकाणी पाणीटंचाई (drought) असून सर्वच पाण्याचे स्रोत आटल्याने पावसाची प्रतीक्षा आहे. सद्यस्थितीत नाशिक जिल्ह्यातील धरणात 8.14 टक्के पाणीसाठा उरला आहे. तर गंगापूर धरणात (gangapur dam) 19.45 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.
राज्यातील अनेक ठिकाणी मॉन्सूनचा पाऊस सक्रीय झाला असून येत्या दोन दिवसांत संपूर्ण राज्य व्यापण्याची शक्यता आहे. मात्र आजही अनेक गाव पाड्यांवर पाणीटंचाई सुरु आहे. तर काही भागात टँकरच्या फेऱ्या सुरु आहेत. नाशिक जिल्ह्यातील बहुतांश गावे तहानलेली असून चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. मागील वर्षी याच दिवशी नाशिक जिल्ह्यातील धरणांत 24.82 टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. मात्र सध्या खूपच कमी पाणी शिल्लक राहिले आहे.
असा आहे धरणसाठा
आजच्या जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार कश्यपी 23.27 टक्के, गौतमी गोदावरी 10.44 टक्के, पालखेड 21.90 टक्के, तर मागील आठवडाभरापासून ओझरखेड, पुणेगाव, तिसगाव धरणात शून्य टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तर दारणा 3.66 टक्के, भावली 0 टक्के, वालदेवी 0 टक्के, मुकणे 3.27 टक्के, नांदूर मध्यमेश्वर टक्के, चणकापुर 4.57 टक्के, हरणबारी 7.80 टक्के, केळझर 0.52 टक्के, गिरणा 12.15 टक्के तर माणिकपुंज 0 टक्के अशी काही महत्त्वाची धरण मिळून 8.14 टक्के असा जलसाठा उपलब्ध आहे. तर जवळपास 8 धरणे शून्यावर आहेत.