Agriculture News : नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) बागलाण तालुक्यातील शेतीसाठीचे पहिले आवर्तन गुरुवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास आरम नदीपात्रात सोडण्यात आले आहे. है आवर्तन शेती सिंचनासाठी वरदान ठरणार आहे. यामुळे नदीकाठावरील सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांना फायदा होणार असून या भागातील गावांची पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर होणार आहे.
बागलाण तालुक्यातील शेतकऱ्यांना वरदान ठरणारे केळझर (गोपाळसागर) व (Kelzar Dam) हरणबारी धरणातून यंदा रब्बी हंगामासाठी अनुक्रमे दोन आवर्तने देण्यात येणार असून कालवा समिती आणि जलसंपदा विभागाच्या बैठकीत दोघा आवर्तनांची तारीख निश्चित करण्यात आली आहे. यामुळे रब्बी हंगामाला दिलासा मिळणार आहे.
चालू वर्षी मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यामुळे यावर्षी रब्बी हंगामासाठी (Rabbi Season) पाण्याची मागणी कमी प्रमाणात असल्याने केळझरमधून पहिले आवर्तन गुरुवारी नदीपात्रात सोडण्यात आले आहे. या पाण्यामुळे रब्बीच्या पिकांना दिलासा मिळणार आहे. केळझरच्या आवर्तनामुळे ११४० तर हरणबारीच्या आवर्तनामुळे १४७० हेक्टर क्षेत्राला याचा लाभ होणार आहे. केळझर (गोपाळसागर) ५७२ दलघफू क्षमतेचे असून हरणबारी ११६६ दलघफू क्षमता असलेले बागलाणमधील मध्यम लघु प्रकल्प आहेत.
तालुक्यातील पूर्व व पश्चिम भागाला होतो लाभ
आरम नदीवर असलेल्या केळझर प्रकल्पावर निकवेल कंधाने, चौंधाने, मुंजवाड, आराई, डांगसौंदाणे बुंधाटे, किंकवारी, वटार, वनोली आदी गावांच्या शेती क्षेत्र व सार्वजनिक पाणीपुरवठा योजना या पाण्यावर अवलंबून आहेत. रब्बी हंगामात सर्वाधिक फायदा बागलाण तालुक्यातील पश्चिम व पूर्व भाग परिसरातील शेतपिकांना होतो.
उन्हाळ्यातील आवर्तनाने वरील सर्वच गावांच्या सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींना फायदा होतो. तर हरणबारी धरण हे मोसम नदीवर असून या धरणाचा फायदा नामपूर, ताहाराबाद, अजंग वडेलसह अनेक गावांसह मालेगाव शहराला होतो. यावर्षी जरी सर्वत्र मुबलक पाणीसाठा असला तरी दोघे ही जलाशय हे या भागासाठी कायमच वरदान ठरले आहेत.
यावर्षी रब्बीचे आवर्तन केळझर (गोपाळसागर) असे
- पहिले आवर्तन दि. ३१.१.२०२५ ते ९. २. २०२५ पर्यंत (२० दलघफू)
- दुसरे आवर्तन दिनांक २७.२.२०२५ ते १०.३.२०२५ (१०० दलघफू)
- तिसरे आवर्तन १५ ते २० मेच्या दरम्यान सोडण्यात येते
- हरणबारी मध्यम प्रकल्प
- पहिले आवर्तन दि. १.०२.२०२५ ते १०.०२.२०२५ (१५६ दलघफू)
- दुसरे आवर्तन दि.१५.३.२०२५ ते २५.०३.२०२५ (१८२ दलघफू)
- तिसरे आवर्तन मे महिन्यात सोडण्यात येते.
यावर्षी धरण परिसरात
समाधानकारक पाऊस झाल्याने आरम नदी आतापर्यंत प्रवाहित होती. यामुळे ख्बी हंगामासाठी पाण्याच्या उपलब्ध साठ्यापेक्षा मागणी कमी होती. यामुळे यावर्षी शेतीसाठी दोन आवर्तन सोडण्यात येणार आहे. उर्वरित जलसाठा पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित करण्यात आला आहे.
- एस. पी. खैरनार, उपअभियंता जलसंपदा विभाग, सटाणा