पुणे : हवामानाचा अंदाज वर्तविण्यासाठी आता एआयचा (कृत्रिम बुद्धिमता) वापर करण्यात येणार असून, त्यामुळे हवामानाची अधिक अचूक माहिती मिळू शकणार आहे. शिवाय या तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांना अधिक फायदा होईल. एकंदरीत एआयच्या वापरामुळे वादळी वारे, मुसळधार पाऊस, चक्रीवादळ या नैसर्गिक आपत्तींची माहिती आधीच समजणार आहे.
गेल्या काही वर्षात नैसर्गिक संकटाची मालिका वाढली असून यात महापूर, चक्रीवादळे आदींचा समावेश आहे. यामुळे अनेकदा जीवितहानी होत असल्याचा घटना समोर आलेल्या आहेत. गतवर्षी नैसर्गिक आपतीमुळे देशात तीन हजार जणांना जीव गमवावा लागला होता. त्यामुळे हवामान अंदाज अचूक असणं महत्वाचं ठरत आहे. मात्र अचूक हवामान अंदाजासाठी एआयचा वापर महत्वाचा ठरणार आहे. एआयमुळे ही हानी रोखता येऊ शकणार आहे. असे हवामान विभागाचे महासंचालक मृत्युजय मोहपात्रा यांनी सांगितले.
माहितीचे डिजिटायझेशन
हवामानाचा अचूक अंदाज देण्यासाठी दीडसे वर्षापासूनच्या नोंदीचा वापर केला जातो. 1901 पासूनच्या माहितीचे डिजिटायझेशन केले आहे. हा डेटा एआय साठी वापरून त्याचा फायदा भविष्यात होणार आहे. सध्या ओडिशा व मध्य प्रदेशात वादळ, मुसळधार पावसाची प्रक्रिया समजून घेण्यासाठी टेस्टिंग युनिट बनवीत आहे.
सिमला ऑफिसला मोठा ठेवा!
शिवाजीनगर येथे 15 जानेवारी 1874 रोजी सिमला येथे हवामान विभाग स्थापन केला. त्यानंतर तो पुण्यात हलविण्यात आला. त्यासाठी दगडी इमारत बांधली असून येथे 1874 पासूनच्या नोंदवह्या आजही पाहायला मिळतात. या सर्व कागदपत्रांचे डिजिटायझेशन केले आहे.