Join us

हिवाळ्यातील पीक नुकसानभरपाईची रक्कम पावसाळ्यात मिळणार का साहेब? शेतकऱ्यांचा सवाल 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2024 1:55 PM

नोव्हेंबर महिन्यातील अवकाळी पावसामुळे झालेल्या पीकनुकसानाची भरपाई अद्यापही पात्र शेतकऱ्यांना मिळालेली नाही.

वाशिम : नोव्हेंबर महिन्यातील अवकाळी पावसामुळे झालेल्या पीकनुकसानाची भरपाई अद्यापही जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना मिळालेली नाही. नुकसानभरपाई मिळण्यास दिरंगाई होत असल्याने शेतकऱ्यांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. तर वाशीम जिल्ह्यातील तीन तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक नुकसानभरपाईपासून वंचित राहावे लागणार आहे. आम्हीच काय घोडे मारले? असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

सन 2023 वर्ष हे शेतकऱ्यांसाठी नैसर्गिक आपत्तीचे ठरले. खरीप हंगामात अपुरा पाऊस पडला. पावसात दीर्घ खंड पडल्याने सोयाबीनचे प्रचंड नुकसान झाले. 10 हजारांपेक्षा अधिक सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अद्याप पीकविम्याची 25 टक्के अग्रिम रक्कम मिळालेली नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांमध्ये अगोदरच खदखद असताना, अवकाळी पावसामुळे झालेल्या पीकनुकसानाची भरपाईदेखील शेतकऱ्यांना मिळालेली नाही. नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे जवळपास 60 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. 

अवकाळी पावसामुळे शेतात पाणी साचल्याने या शेतातील हरभरा पीक जळून गेले होते. अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. नैसर्गीक आपत्तीत सापडलेल्या या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळणे शेतकऱ्यांना अपेक्षित आहे. मात्र भरपाई मिळण्यास विलंब होत असल्याने शेतकऱ्यांमधून संतप्त प्रतिक्रीया उमटत आहे. भरपाई नेमकी केव्हा मिळणार याकडे लक्ष लागून आहे. याबाबत बाबाराव पाटील खडसे म्हणाले की, अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला होता. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात तूर, कपाशी यांसह अन्य पिकांचे अतोनात नुकसान झाले. असे असताना तीन तालुके वगळणे आणि भरपाई न मिळणे हा शेतकऱ्यांवर अन्याय आहे.

चक्रधर गोटे म्हणाले की, नैसर्गिक आपत्तीमुळे सन 2023 या वर्षात पिकांचे अतोनात नुकसान झाले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वेळेवर मदत देण्याऐवजी दिरंगाई होत असल्याने शेतकऱ्यांवर हा एकप्रकारे अन्याय आहे. या अन्यायाविरोधात आवाज उठविला जाईल. तर अवकाळी पावसामुळे कारंजा, मंगरुळपीर व मानोरा या तीन तालुक्यात शासन निकषानुसार पीक नुकसान झाले नसल्याचे पंचनामा अहवाल सांगतो. त्यामुळे या तीन तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक नुकसानभरपाईपासून वंचित राहावे लागणार आहे. आम्हीच काय घोडे मारले? असा सवाल या शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. या तीन तालुक्यात पिकांचे नुकसान झाल्याने या तालुक्यातील शेतकऱ्यांना देखील भरपाई मिळणे अपेक्षित आहे. मात्र नुकसानग्रस्ताच्या यादीत या तालुक्यांचा समावेश नाही याकडे शासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

कोरडवाहू पिकांचे अधिक नुकसान

नोव्हेंबर महिन्यातील अवकाळी पावसामुळे कोरडवाहू पिकांचे अधिक नुकसान झाले. 24 हजार 853 हेक्टरवरील बागायती पिकांचे तर 35 हजार 397 हेक्टरवरील कोरडवाहू पिकांचे नुकसान झाल्याचे जिल्हा प्रशासनाच्या अंतिम पंचनामे अहवालात नमूद आहे. डॉ. सुधीर कवर म्हणाले की, शेतमालाला समाधानकारक बाजारभाव नसणे, अवकाळी पावसामुळे झालेली पीक नुकसानभरपाई न मिळणे यावरून शेतकऱ्यांप्रती दिरंगाईचे धोरण सुरू असल्याचे दिसून येते. शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी पुन्हा लढा उभारला जाईल. हेमेंद्र ठाकरे म्हणाले की, अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकाची नुकसानभरपाई अद्यापही न मिळणे म्हणजे नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार होय. शेतकऱ्यांमध्ये कोणताही भेदभाव न करता सर्वांना सरसकट भरपाई मिळावी. 

पिकांच्या व्यवस्थापनापासून ते योजनापर्यंत, कृषि विषयक सर्व अपडेट्ससाठी लोकमत Agro चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा…

टॅग्स :वाशिमपाऊसपीक विमाशेती