अहमदनगर : मुळा, भंडारदरा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मंगळवारी दिवसभर पावसाचा (Rain) जोर कमी झाला. शिवाय आज सकाळपासून देखील पावसाने उघडीप दिली आहे. मात्र असे असले तरी मागील तीन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे तीन दिवस धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. तर काल मंगळवारी सायंकाळी ६ वाजता या धरणातील पाणीसाठा (Dam storage) तीस टक्क्यांहून अधिक झाला आहे.
मागील आठवड्यात शुक्रवार, शनिवार व रविवार या तीन दिवसांत मुळा भंडारदरा (Bhandardra Dam) धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळला. यामुळे येथील ओढे-नाले दुथडी भरून वाहत होते. यामुळे या दोन्ही धरणांमध्ये नवीन पाण्याची आवक चांगली झाली. सोमवारी आणि मंगळवारी दिवसभर पावसाचे प्रमाण कमी झाले आणि पुन्हा वाढले. या परिस्थितीत भंडारदरा धरणात मंगळवारी दिवसभराच्या बारा तासांत ८८ दशलक्ष घनफूट नवीन पाण्याची आवक झाली. भंडारदरा धरणातील पाणीसाठा तीस टक्क्यांहून अधिक म्हणजेच ३ हजार ३४३ दशलक्ष घनफुटांपर्यंत पोहोचला.
वाकीचा विसर्ग झाला कमीशिखर स्वामिनी कळसूबाईच्या परिसरातही पावसाचे प्रमाण कमी आल्यामुळे वाकी येथील लघुपाटबंधारे तलावावरून वाहणारा विसर्गही कमी झाला. सद्यस्थितीत तो ३७६ क्युसेक इतका झाला आहे. सायंकाळी ६ वाजता निळवंडे धरणातील पाणीसाठा १ हजार ९७ दलघफू इतका झाला होता. तर मुळा खोऱ्यातही पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे सकाळी ६ वाजता मुळेचा लहितजवळील विसर्ग दोन दिवसांच्या तुलनेने कमी होत तो ३ हजार ४१६ क्युसेकवर आला होता.
महाराष्ट्रात पाऊस कधी-कुठे? पुढील ४ दिवस म्हणजे शनिवार दि.१३ जुलै पर्यन्त कोकणात अतिजोरदार, विदर्भात जोरदार,तर खान्देश नाशिक नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर जिल्ह्यात मध्यम ते जोरदार व मराठवाड्यातील जिल्ह्यात किरकोळ पावसाची शक्यता जाणवते. रविवार १४ जुलै पासून त्यापुढील ४ दिवस म्हणजे गुरुवार दि. १८ जुलै पर्यन्त मराठवाड्यासहित संपूर्ण महाराष्ट्रात सध्याच्या तेथील पावसापेक्षा अधिक पावसाची शक्यता कायम जाणवते. विशेषतः सिंधुदुर्ग सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर धाराशिव लातूर नांदेड परभणी जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता अधिक जाणवते.