Join us

Bhandardara Dam : भंडारदरा धरण भरले, धरणातून विसर्ग किती? जाणून घ्या सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2024 5:49 PM

Bhandardara Dam : उत्तर अहमदनगर जिल्ह्याची (Ahmednagar) भाग्यरेखा ठरलेले भंडारदरा धरण शुक्रवारी सायंकाळी भरले.

अहमदनगर : धरणाच्या सांडव्यावरून जलाशयातील लाटा फेसाळत बाहेर पडू लागल्या आणि उत्तर अहमदनगर जिल्ह्याची (Ahmednagar) भाग्यरेखा ठरलेले भंडारदरा धरण शुक्रवारी सायंकाळी भरले. यावर्षी उन्हाळ्यातील पाणीटंचाई आणि त्यातच जायकवाडीसाठी सुमारे साडे ३ हजार दलघफू पाणी सोडण्यात आल्यामुळे भंडारदरा धरणाच्या (Bhandardara Dam) पाणी साठ्याने तळ गाठला होता. पावसाळा सुरू होण्यापूर्वी या वर्षी धरणात अवघे तीनशे दलघफुटांपेक्षा कमी पाणी शिल्लक होता.

पावसाळा सुरू झाल्यानंतर पाणलोट क्षेत्रात अनेकदा पावसाची संततधार (Heavy Rain) सुरू होती. २४ जुलै रोजी पाणलोट क्षेत्रास अतिवृष्टीचा तडाखा बसला होता तर, दुसऱ्याच दिवशी २५ जुलै रोजी पाणलोट क्षेत्रात पावसाने धुमाकूळ घातला होता. २५ जुलै रोजी तब्बल ३४२ तर रतनवाडी व पांजरे येथे अनुक्रमे ३२६ आणि ३१५ मिलीमीटर पाऊस कोसळला होता. यामुळे या परिसरातील ओढ्या नाल्यांनाही मोठा पूर आला होता आणि धरणात मोठ्याप्रमाणावर नवीन पाण्याची आवक झाली. २१ जुलै ते २ ऑगस्ट या बारा दिवसांत धरणात मोठ्या प्रमाणात म्हणजेच ५ हजार ५०० दशलक्ष घनफूट नवीन पाण्याची आवक झाली होती. 

तर २५ जुलै रोजी धरणातून वीज निर्मितीसाठी ८३० क्युसेकने पाणी सोडण्यास सुरुवात झाली होती. ३१ जुलै रोजी सायंकाळी चार वाजता धरणातील पाणीसाठा दहा हजार दलघफूहून अधिक झाल्यानंतर धरणातील पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणाच्या स्पिलवे गेटमधून प्रथमच ६०९ क्युसेकने पाणी सोडण्यास सुरुवात झाली. एक ऑगस्ट रोजी या विसर्गात वाढ करण्यात आली होती. भंडारदरा धरणातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात येत असल्यामुळे आता निळवंडे धरणातील पाणी साठ्यातही मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. सायंकाळी यातील पाणीसाठा ६० टक्क्यांहून अधिक म्हणजेच ४ हजार ७११ दलघफू इतका होता.

पावसाचा जोर; विसर्ग वाढणारदोन ऑगस्ट रोजी दिवसभर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढला. त्यामुळे अवघ्या बारा तासात धरणात २८६ दलघफू नवीन पाण्याची आवक झाली आणि स्पेलिंग गेटमधून सोडण्यात येणाऱ्या विसर्गातही वाढ करत तो ३ हजार ८८१ करण्यात आला पुन्हा सायंकाळी सात वाजता यात वाढ करत तो ६ हजार ५९० व वीज निर्मितीसाठी ८३० असे एकूण ७ हजार ४२० क्युसेक ने पाणी नदीपात्रात सोडण्यात सुरुवात झाली. दिवसभर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढत असल्याने धरणात नवीन पाण्याची होत असलेली आवक लक्षात घेत रात्री पुन्हा या विसर्गात वाढ होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :अहमदनगरधरणपाऊसहवामानमोसमी पाऊस