Bhandardara Dam : अहमदनगर जिल्ह्यांतील महत्वाचे धरण असलेल्या भंडारदरा धरणाचे (Bhandardara Dam) नाव बदलण्यात आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नाव बदलण्याबाबत विचार विमर्श सुरु होता. अखेर आज भंडारदरा धरणाचे आद्यक्रांतीकारक वीर राघोजी भांगरे जलाशय' असे नामकरण करण्यात आले आहे. याबाबतचा शासन निर्णय देखील जारी करण्यात आला आहे.
अकोले तालुक्यात असलेल्या भंडारदरा धरणाच्या नामकरणाबाबतअनेक अर्ज शासनाला प्राप्त झाले होते, ज्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत शासन निर्णयात म्हंटले आहे कि, “जलसंपदा विभागाच्या अखत्यारितील अकोले तालुक्यातील भंडारदरा जलाशयास आद्यक्रांतीकारक वीर राघोजी भांगरे जलाशय असे नामकरण देणेबाबत शासनास विविध अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यानुसार सदर जलाशयास “आद्यक्रांतीकारक वीर राघोजी भांगरे जलाशय” असे नामकरण करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.”
त्यानुसार आज भंडारदरा धरणास “आद्य क्रांतीकारक वीर राघोजी भांगरे जलाशय” असे नाव देण्यात आले आहे. हे धरण नदीवर ब्रिटिशांच्या काळात बांधलेले धरण आहे. प्रवरा नदीचा उगम जवळच्या रतनगडावर झालेला आहे. प्रवरा नदीचे पाणी हे अमृतासमान असून म्हणून नदीला "अमृतवाहिनी" असे म्हणले जाते. विशेष म्हणजे भंडारदरा धरणाचे मूळ नाव नाव विल्सन डॅम असून त्याच्या जलाशयास आर्थर लेक असे म्हणले जाते. मात्र आता या धरणाला नवे नाव मिळाले आहे.
पर्यटकांना आकर्षित करणारे धरण
भंडारदरा धरण अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यात असून या धरणाजवळच भंडारदरा नावाचे गाव आहे. तसेच या गावाजवळ जलविद्युत केंद्र आहे. भंडारदरा धरण परिसर निसर्ग सौंदर्याने नटलेला असलेला असल्याने या परिसरात वर्षभर पर्यटकांचा राबता असतो. येथील छोटे मोठे धबधबे, डोंगरकडे, जलाशय, हिरवी झाडे, शुद्ध आणि थंड हवा हे येथील मूळच्या सौंदर्यात अजूनच भर टाकतात. विशेष भंडारदरा धरण आणि रंधा धबधबा हे पर्यटकांचे येथील मुख्य आकर्षणाचे केंद्रबिंदू आहेत.