एकीकडे उन्हाचा कडाका वाढत असताना दुसरीकडे उत्तर महाराष्ट्रात तुरळक पावसाची शक्यता मुंबई वेधशाळेने वर्तविली आहे. याबाबत पुष्टी विभागीय संशोधन केंद्र इगतपुरी केली आहे.
आज सकाळपासून नाशिकसह काही भागात ढगाळ वातावरण आहे. मात्र ढगाळ वातावरण असताना देखील उकाडा जाणवत आहे. तर यापूर्वी विदर्भासह मराठवाड्यातील काही पट्ट्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. आता नाशिकसह जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह 30-40 किमी प्रतितास वेगाने वादळी वारे आणि पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. येत्या ३ ते ४ तासात घराबाहेर पडताना खबरदारी घ्या असे आवाहन आयएमडी मुंबई विभागाने केले आहे.
हवामान विभागाच्या वेधशाळेने आज सकाळी नऊ वाजेच्या सुमारास ही सूचना प्रसारित केल्याचे इगतपुरी विभागीय संशोधन केंद्राने कळविले आहे. त्यानुसार उत्तर महाराष्ट्रातील अहमदनगर वगळता इतर जिल्ह्यात तुरळक पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
ढगाळ वातावरणात उन्हाचा लहर
एकीकडे दिवसेंदिवस वाढत्या उन्हामुळे जीवाची लाही लाही झाली आहे. तर आज सकाळपासून ढगाळ वातावरण अनुभवयास मिळत आहे. तरीदेखील उन्हाचा तडाखा वाढू लागला आहे.