गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका वाढत असून आज राज्यातील काही भागात ३४ अंशापर्यंत तापमान गेल्याचे दिसून आले. त्यानुसार पुढील पाच दिवस नाशिक जिल्ह्यासाठी तापमान कसे असेल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर महात्मा फुले कृषी विद्यापिठाच्या अंतर्गत असलेल्या विभागीय कृषी संशोधन केंद्र, इगतपुरी यांनी पाच दिवसांचा हवामान अंदाज वर्तविला आहे.
विभागीय कृषी संशोधन केंद्र, इगतपुरी यांच्या हवामान अंदाजानुसार पुढील पाच दिवसाचा अंदाज लक्षात घेता हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. आकाश आकाश पुढील पाच दिवस निरभ्र राहील. कमाल तापमान ३३-३५ डिग्री सें. व किमान तापमान १५-१७ डिग्री सें. दरम्यान राहण्याची शक्यता आहे. तसेच वा-याचा वेग ९-१४ कि.मी/तास या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. कोरडे व उष्ण हवामान लक्ष्यात घेता दुभत्या जनावरांची तसेच पशुधन (गाय, म्हैस, शेळी व मेंढी इ. ) यांचे योग्य गोठा व्यवस्थापन, आहार नियोजन तसेच आरोग्य व्यवस्थापनावर करून उष्णतेचा ताण कमी करावा.
या काळात उन्हाळी वेलवर्गीय भाजीपाला पिकांस खुरपणी देऊन नत्र खताचा दुसरा हफ्ता द्यावा. गवार पिकाची काढणी सुरु करावी. रबी हंगामातील कोबीवर्गीय पिकांची काढणी करावी. मिरची व वांगी रोपे तयार झाली असल्यास रोपांची पुनर्लागवड करावी. लागवडीचे वेळेस संपूर्ण खतमात्रेच्या ५० टक्के नत्र, संपूर्ण स्फुरद व पालाश द्यावे. वेल वर्गीय पिके: वेल वाढत असताना बगलफूट आणि तणावे काढावेत, पाने काढू नयेत. वेल ५ फूट उंचीचा झाल्यावर बगलफूट काढणे थांबवावे व मंडपावर वेली वाढू द्याव्यात. म्हणजे दर्जेदार उत्पादन मिळते.
उन्हाळी भेंडी काढणी एक दिवस आड करावी. रब्बी ज्वारी पिकाची काढणी म.फु.कृ.वि. राहुरीद्वारे विकसित सुधारित फुले ज्वारी काढणी यंत्राचा सहाय्याने करावी. गव्हाच्या काही जातींचे (उदा. एनआय.५४३९, फुले त्र्यंबक) दाणे पीक पक्व झाल्यानंतर शेतात झडतात व नुकसान होते. तसे होऊ नये म्हणून पीक पक्व होण्याच्या २ ते ३ दिवस आधी गव्हाची कापणी करावी. उन्हात वाळवल्यानंतर मका पिकाच्या कणसाच्या वरील आवरण काढून मका सोलणी यंत्राच्या (म.फु.कृ.वि. राहुरीद्वारे विकसित सुधारित अवजार) साह्याने कणसातील दाणे वेगळे करावेत.
सौजन्य :
ग्रामीण कृषी मौसम सेवा
कृषि हवामान प्रक्षेत्र विभाग
महात्मा फुले कृषी विद्यापीठ,
विभागीय कृषी संशोधन केंद्र, इगतपुरी
ता. इगतपुरी, जि. नाशिक