Join us

Weather Report : मराठवाडा, विदर्भासह खान्देशात गारपिटीची शक्यता, काय सांगतोय हवामान अंदाज? 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2024 7:14 PM

आज देखील अवकाळी पावसाचे वातावरण असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.

Weather Report : हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार विदर्भासह मराठवाडा जळगाव आदी भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यांनतर मात्र आज देखील अवकाळी पावसाचे वातावरण असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान काल खान्देश, मराठवाडा व विदर्भात झालेल्या विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर आताही महाराष्ट्रातील बहुतांश भागात अवकाळीचे वातावरण अजूनही टिकूनच असल्याची माहिती जेष्ठ निवृत्त हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली आहे.     सध्या मार्गस्थ होत असलेल्या प. झंजावाताबरोबरच गुरुवारी २९ फेब्रुवारीला पुन्हा एक प.झंजावात मार्गस्थ होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर गुजरातमधील पोरबंदर जिल्ह्याच्या पश्चिम किनारपट्टी अरबी समुद्र ते राजस्थानच्या जोधपूर पर्यंत पसरलेल्या समुद्रसपाटीपासून जवळपास १ किमी. उंचीपर्यंतच्या हवेच्या कमी दाबाच्या निर्वात पोकळीच्या जाडीच्या आस यांच्या एकत्रित परिणामातून संपूर्ण उत्तर भारतात, शनिवार ०२ मार्चपर्यंत (विशेषतः १ व २ मार्चला अधिक) जोरदार पाऊस व जबरदस्त बर्फबारी होण्याची शक्यता वाढली आहे.       तसेच महाराष्ट्रासह कर्नाटकातील चिकमंगलूर ते महाराष्ट्रातील सातारा, रत्नागिरीपर्यंत समुद्रसपाटीपासून जवळपास १ किलोमीटरपर्यंत उंचीपर्यंतच्या हवेच्या कमी दाबाच्या निर्वात पोकळीच्या जाडीत पसरलेल्या आसामुळे मुंबईसह कोकण वगळता महाराष्ट्रातही वीजा, वाऱ्यांसाह अवकाळी पावसाची शक्यता अजुन ४ दिवस वाढली आहे. ही अवकाळी पावसाची शक्यता येत्या शनिवार २ मार्चपर्यंत असणार आहे. आज देखील मराठवाडा, विदर्भ व खान्देशात तुरळक ठिकाणी गारा पडण्याची शक्यताही नाकारता येत नसल्याचे माणिकराव खुळे यांनी स्पष्ट केले आहे. 

 पिकांच्या व्यवस्थापनापासून ते योजनापर्यंत, कृषि विषयक सर्व अपडेट्ससाठी लोकमत Agro चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा…

टॅग्स :शेतीहवामानतापमानपाऊस