एकीकडे वाढत्या तापमानाने जीवाची लाही लाही झाली असताना ऐन रब्बी हंगामातील पिकांच्या काढणीदरम्यान पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मागील काही महिन्यापासून बदलत्या वातावरण शेती क्षेत्राला मोठा फटका बसला असून काही दिवसांवर आलेल्या गुढीपाडव्याला ' विदर्भ-मराठवाड्यात गारपीटीची शक्यता ' जेष्ठ निवृत्त हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केली आहे.
अवकाळीचे वातावरण व गारपीट -
आज शनिवार दि.६ ते बुधवार दि.१० एप्रिल पर्यंतच्या ५ दिवसात मुंबईसह कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रातील २९ जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहून तुरळक ठिकाणी किरकोळ अवकाळी पावसाची शक्यता जाणवते. परंतु खान्देश व विदर्भ-मराठवाड्यातील २२ जिल्ह्यात मात्र गुढीपाडवा व करीला म्हणजे मंगळवार व बुधवार (९ व १० एप्रिल) असे दोन दिवस मध्यम अवकाळी पावसाबरोबर गारपीटीचीही शक्यता जाणवते.
किनारपट्टीवरील दमटयुक्त उष्णता-
मुंबईसह कोकणातील ७ जिल्ह्यात तसेच लगतच्या गोवा राज्यात आज व उद्या दोन दिवस म्हणजे (६ व ७ एप्रिल, शनिवार व रविवारी) दिवसा दमटयुक्त उष्णतेचा अनुभव येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
लेखक : जेष्ठ निवृत्त हवामान तज्ञ माणिकराव खुळे
शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी?
हवामानाचा अंदाज आणि स्थानिक हवामानाची स्थिती ओळखून शेतकऱ्यांनी दि. ७ एप्रिल २०२४ आधीच रबी पिकांची कापणी/मळणी त्वरित पूर्ण करावी तसेच कापणी केलेल्या पिकांना सुरक्षित जागेवर किंवा प्लास्टिक / ताडपत्रीने झाकून ठेवावे. तसेच स्थानिक हवामानाची स्थिती ओळखून (खाली दिलेल्या सर्व पिकांच्या सल्ल्यातील) फवारणीच्या व इतर कामांची आखणी करावी.
उन्हाळी पिकात सूक्ष्म सिंचनाचा (उदा. तुषार सिंचन) उपयोग करून पाण्याची बचत करावी. वाढते तापमान व पाण्याच्या अभावाखाली शेतकर्यांना सल्ला देण्यात येतो कि फळ व भाजीपाला पिकांमध्ये मल्चिंगचा वापर करून बाष्पीभवनाच वेग कमी करावा. उन्हाळी वेलवर्गीय भाजीपाला पिकांस खुरपणी देऊन नत्र खताचा दुसरा हफ्ता द्यावा. नवीन लावलेल्या फळझाडांना गवताचे शेड करून तीव्र सुर्यकिरणांपासून त्यांचे संरक्षण करावे. तापमानाचा अंदाज लक्ष्यात घेता उन्हाळी पिकांना पाणी द्यावे.
- विभागीय संशोधन केंद्र इगतपुरी