Join us

Weather Update : राज्यातील 'या' 24 जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेची शक्यता, वाचा हवामान अंदाज 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2024 11:15 PM

संपूर्ण विदर्भ, मराठवाडासह 24 जिल्ह्यात पुढील पाच दिवस उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

संपूर्ण विदर्भ, मराठवाडा, नंदुरबार, धुळे, जळगांव, नाशिक, नगर अशा २४ जिल्ह्यात दुपारचे कमाल तापमान सरासरीपेक्षा ४ ते ६ डिग्री से. ग्रेड ने अधिक म्हणजे ४० ते ४४ डिग्री से. ग्रेड दरम्यानचे राहून आजपासुन पुढील पाच दिवस म्हणजे शनिवार दि २५ मे पर्यंत उष्णतेच्या लाटेची स्थिती जाणवू शकते. तसेच दरम्यानच्या पाच दिवसात गुजरात राज्य व मुंबईसह कोकणातील ७ जिल्ह्यात उष्णतेची लाट सदृश स्थितीसहित दमटयुक्त उष्णतेची स्थिती जाणवेल. विशेषतः या उष्णतेचा प्रभाव मुंबई शहर, ठाणे, पालखेड येथे अधिक जाणवेल, अशी शक्यता जेष्ठ निवृत्त हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केली आहे. 

        अवकाळीची शक्यता कायमच-               उष्णतेची लाट सदृश्य स्थिती असली तरी संपूर्ण महाराष्ट्रात आजपासुन पुढील ५ दिवस म्हणजे शनिवार दि.२५ मे पर्यन्त ढगाळ वातावरणासहित तुरळक ठिकाणी किरकोळ अवकाळी पावसाची शक्यता कायम असुन गुरुवार, शुक्रवार, दि.२३ व २४ मे असे दोन दिवस दक्षिण महाराष्ट्रातील कोल्हापूर सांगली सोलापूर बीड धाराशिव लातूर परभणी नांदेड या ह्या ८ जिल्ह्यात अवकाळीची शक्यता अधिक जाणवेल.             मराठवाडा व विदर्भातील १९ जिल्ह्यात मात्र शुक्रवार दि.२४ मे  पासून अवकाळीचे ढगाळ वातावरणही निवळेल. तर मुंबईसह कोकण, खान्देश, नाशिक नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर येथे मात्र २४ मे नंतरही वातावरण टिकून राहील. रविवार दि.१९ मे ला अंदमानवर पोहोचलेल्या मान्सूनची आगेकूच कायम असुन बंगालच्या उपसागरात आठवड्यादरम्यान कदाचित चक्रीवादळाच्या बीज-रोवणीही होवु शकते असे वाटते. अर्थात त्यासंबंधीचे चित्र अजुन स्पष्ट व्हावयाचे आहे. 

लेखक : माणिकराव खुळे, जेष्ठ निवृत्त हवामान तज्ञ, पुणे आयएमडी 

नाशिक जिल्ह्यासाठी काय? इगतपुरी विभागीय संशोधन केंद्राच्या माध्यमातून आलेल्या हवामान अंदाजानुसार नाशिक जिल्ह्यात पुढील पाच दिवस हवामान अति उष्ण व दमट राहण्याची शक्यता आहे. आकाश पुढील पाच दिवस ढगाळ ते अंशतः ढगाळ राहील. कमाल तापमान ४०-४२ डिग्री सें. व किमान तापमान २३-२४ डिग्री सें. दरम्यान राहण्याची शक्यता आहे तसेच वा-याचा वेग १७-३२ कि.मी/तास या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :हवामाननाशिकमहाराष्ट्रतापमानपाऊस