Join us

Nashik Rain Update : नाशिक जिल्ह्यात हलका ते मध्यम पावसाची शक्यता, शेतकऱ्यांना पेरणीबाबत आवाहन 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2024 6:10 PM

Nashik Rain Update : नाशिक जिल्ह्यात २२ ते २६ जून २०२४ दरम्यान हलका ते मध्यम पावसाची (Rain) शक्यता आहे.

Rain Update :नाशिक जिल्ह्यात २२ ते २६ जून २०२४ दरम्यान हलका ते मध्यम पावसाची शक्यता (Rain) आहे. यातही काही भागात दि. २४ व २५ जून २०२४ रोजी मेघगर्जनेसह विजांच्या कड़कडाट, हलका ते मध्यम पाऊस व सोबत सोसाट्याचा वारा असण्याची शक्यता मुंबई वेधशाळेने वर्तवली आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) शेतकऱ्यांसाठी महत्वाचे आवाहन करण्यात आले आहे. 

नाशिक जिल्ह्यात झालेल्या समाधानकारक पाऊस व पुढील पाच दिवसांच्या पावसाचा अंदाज लक्षात घेता वापश्यावर बीजप्रक्रिया (Sowing) करावी. तसेच मुग व उडीद पिकांची पेरणी (farming) करावी. पुढील पाच दिवसाचा अंदाज लक्षात घेता दि. २२ ते २६ जून २०२४ दरम्यान हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. तसेच हवामान दमट राहण्याची शक्यता राहील. आकाश पुढील पाच दिवस ढगाळ राहील. तसेच कमाल तापमान २८-३३ डिग्री से. व किमान तापमान २३-२५ डिग्री से. दरम्यान राहण्याची शक्यता आहे तसेच वा-याचा वेग १६-२५ कि.मी/तास या दरम्यान राहण्याची शक्यता आहे.

शेतीसाठी काय सूचना 

कांदा, वांगी, मिरची, टोमॅटो, फ्लॉवर व कोबीचे रोप तयार करण्यासाठी बियांची पेरणी करावी. पेरणीआधी बीजप्रक्रिया करावी. रोपवाटिकेस सुरुवातीला झारीने पाणी द्यावे, नंतर पाटपाणी दिले तरी चालू शकते. मान्सून तसेच पावसाचा अंदाज लक्षात घेता नाशिक जिल्ह्यात पेरणी योग्य पाऊस पडलेल्या ठिकाणी जसे पश्चिम घाट विभाग (इगतपुरी, त्र्यंबकेश्वर) व उपपर्वतीय विभाग (पेठ, सुरगाणा व नाशिकचा काही दक्षिण व पश्चिम भाग) खरीप भात, नागली, वरई पिकांची रोपवाटिकेत पेरणी पूर्ण करावी, तसेच पूर्वेकडील अवर्षण प्रवण व मैदानी विभाग जसे (सिन्नर, येवला, नांदगाव, मालेगाव, चांदवड व निफाड, दिडोरी, कळवण) ठिकाणी समाधानकारक पाऊस झालेला आहे. म्हणून खरीप पिकांची पेरणी वाफसा आल्यानंतर (६५ ते १०० मी.मी. पाऊस) त्वरित सुरु करावी. पेरणी योग्य पाऊस नसलेल्या ठिकाणी वाफसा आल्यानंतरच (६५ ते १०० मी.मी. पाऊस) पेरणी सुरु करावी हवामानाचा अंदाज लक्षात घेता पशुधन, कुक्कुट पक्षी आणि स्वतःचे मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाट पासून संरक्षण करा.

इथे करा तक्रार 

बनावट बियाणे, खतांपासून शेतकऱ्यांनी सावध व्हावे, पक्के बिल घेवूनच तसेच अधिकृत केंद्रातूनच शेतकऱ्यांनी खते, बियाणे खरेदी करावे, नकली वाणांपासून सावध होवून फसवुणकीपासून दूर रहावे. स्वदेशीच्या नकली वाणांपासून शेतकऱ्यांनी सावधानता बाळगावी. अनधिकृत, अवैधरीत्या व बिना बिलाने बियाणे व खतांची खरेदी करू नये. तसेच अशा कृषी निविष्ठांची अनधिकृतपणे विक्री करत असल्याचे दिसून आल्यास संबंधीत तालुका कृषी अधिकारी किंवा जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालय यांच्याकडे तक्रार करावी. 

संकलन : 

ग्रामीण कृषी मौसम सेवा, इगतपुरी 

टॅग्स :हवामानशेतीशेती क्षेत्रनाशिकपाऊस