नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, सुरगाणा आदी तालुक्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. यात मोठ्या प्रमाणात शेती पिकांसह घरांचे नुकसान झाले. त्यानंतर आज सकाळपासून मात्र उन्हाचा कडाका पुन्हा जाणवू लागला आहे. अशात पुढील चार दिवस नाशिक जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता विभागीय कृषी संशोधन केंद्र, इगतपुरी यांनी वर्तविली आहे.
मुंबई प्रादेशिक हवामान केंद्र,यांच्याकडून प्राप्त हवामान अंदाजानुसार आज 16 एप्रिल रोजी पुढील ३-४ तासांत नाशिक, पुणे, सातारा जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी गडगडाटी वादळासह विजांच्या कडकडाटासह आणि ताशी ३०-४० किमी वेगाने वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच पुढील पाच दिवसाचा अंदाज लक्षात घेता दि. १७ व २० एप्रिल २०२४ रोजी हलक्या पावसाची शक्यता आहे. तसेच उर्वरित दिवस हवामान उष्ण राहण्याची शक्यता आहे. आकाश पुढील पाच दिवस अंशतः ढगाळ ते ढगाळ राहील. कमाल तापमान ३९-४१ डिग्री सें. व किमान तापमान २३-२७ डिग्री सें. दरम्यान राहण्याची शक्यता आहे. तसेच वा-याचा वेग १२-१६ कि.मी/तास या दरम्यान राहण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांसाठी महत्वाचे..
तसेच १७ व २० एप्रिल २०२४ रोजी हलक्या पावसाचा अंदाज लक्षात घेता शेतकऱ्यांनी कापणी केलेल्या पिकांना सुरक्षित जागेवर किंवा प्लास्टिक/ ताडपत्रीने झाकून ठेवावे. ढगाळ हवामान लक्षात घेता कीड व रोगांचा प्रादुर्भाव आढळून आल्यास तज्ञांच्या सल्ल्यानुसार नियंत्रणाचे उपाय करावेत. पावसाचा अंदाज लक्षात घेता शेतकर्यांनी मळणी केलेल्या रबी पिकांना सुरक्षित जागेवर किंवा प्लास्टिक/ ताडपत्रीने झाकून ठेवावे. उन्हाळी भाजीपाला पिकारील मावा, फुलकिडे तसेच तुडतुडे यांच्या नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रिड १७.८ टक्के एस. एल ५ मिली किंवा फिप्रोनिल ५ टक्के एस.सी ३५ मिली १० लिटर पाण्यातून फवारावे. वेलवर्गीय भाजीपाल्याची काढणी वेळेवर करावी.
कृषी सल्ला
फुलोरा ते दाणे भरण्याच्या अवस्थेत असलेल्या बाजरी पिकाला पाण्याची तिसरी पाळी द्यावी. उन्हाळी भुईमुग पिकात आ-या व शेंगांची संख्या वाढवण्यासाठी फुलोरा अवस्थेत रिकामा ड्रम फिरवावा. मळणी केलेल्या गहू पिकाचे पावसापासून संरक्षण करावे. पावसाचा अंदाज लक्षात घेता डाळिंब, आंबा व द्राक्ष बागेतील जमिनीवर पडलेला काडीकचरा, पालापाचोळा व खराब / सडलेली फळे गोळाकरून नष्ट करून बागेला स्वच्छ ठेवावे. विजांचा कडकडाटासह वादळ व पावसापासून पशुधन व कुक्कुट पक्ष्यांचे साठवलेले पशुखाद्य, चारा व कडबा याचे प्लास्टिक/ ताडपत्रीने झाकून संरक्षण करावे.
सौजन्य
ग्रामीण कृषी मौसम सेवा
कृषि हवामान प्रक्षेत्र विभाग
महात्मा फुले कृषी विद्यापीठ,
विभागीय कृषी संशोधन केंद्र, इगतपुरी