Join us

कुठे पाऊस तर कुठे ढगाळ हवामान, काय सांगतोय हवामान अंदाज 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2024 8:45 AM

विदर्भात दोन दिवस तुरळक ठिकाणी गडगडाटीसह मध्यम पावसाची व्यक्त केलेली शक्यता ही कायमच आहे.

गेल्या दोन दिवसांपासून थंडीत पुन्हा वाढ झाली असून याबाबत जेष्ठ निवृत्त हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी हवामान अंदाज वर्तविला आहे. त्यानुसार विदर्भातील सर्व ११ जिल्ह्यात आज, उद्या (शनिवार ते सोमवार) दरम्यान तीन दिवस तुरळक ठिकाणी गडगडाटीसह मध्यम पावसाची व्यक्त केलेली शक्यता ही कायमच आहे. या गडगडाटीसह मध्यम पावसाच्या शक्यतेबरोबरच उंचीच्या वेगवेगळ्या पातळीवर दोन्हीही समुद्रातून येणाऱ्या आर्द्रतेमुळे, वातावरणात अस्वस्थ (इनस्टेबल) अवस्थाही निर्माण होवु शकते. त्यामुळे विशेषतः आज एक दिवस, अकोला, वाशिम, यवतमाळ,अमरावती, वर्धा, नागपूर भंडारा गोंदिया ह्या ८ जिल्ह्यात व लगतच्या परिसरात तुरळक ठिकाणी कदाचित एक दिवसासाठो अगदीच किरकोळ गारपीट होण्याची शक्यताही नाकारता येणार नाही. अर्थात ही शक्यता फारच कमी जाणवत असल्याचे त्यांनी सांगितले.                         जेष्ठ निवृत्त हवामान तज्ञ माणिकराव खुळे पुढे म्हणतात की, महाराष्ट्राच्या उर्वरित संपूर्ण कोकण, म. महाराष्ट्र व मराठवाड्यातील २८ जिल्ह्यात मात्र गारपीटीची अशी कोणतीही शक्यता जाणवत नाही. कोकण वगळता मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील १८ जिल्ह्यात फक्त आज व उद्या दि.१०-११ फेब्रुवारीला (शनिवार, रविवार) दोन दिवस ढगाळ वातावरणाची व अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता ही कायम आहे. मुंबईसह कोकणातील ७ जिल्ह्यात मात्र  वातावरण स्वच्छ असेल. 

थंडीचा शेवट                  विदर्भातील या ३ दिवसाच्या पावसाळी वातावरण मावळल्यानंतर मंगळवार १३ फेब्रुवारीपासून महाराष्ट्रातील थंडी कायमचीच गायब होवून या वर्षीच्या हिवाळी हंगामाच्या थंडीची सांगता झाली, असेच समजावे. 

मध्य महाराष्ट्रातील १० जिल्ह्यात जाणवणारा विशेष परिणाम

मध्य महाराष्ट्रातील विशेषतः नंदुरबार धुळे जळगांव नाशिक व मराठवाड्यातील उत्तर छ. सं. नगर अश्या (४+१)५ जिल्ह्यात पहाटेचे किमान तापमान हे सरासरीपेक्षा अधिक जाणवण्याची शक्यता आहे. म्हणजेच ह्या ५ जिल्ह्यात दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात जो काही सरासरी इतका पहाटेचा गारवा जाणवत असे त्या ऐवजी अधिक ऊबदारपणा जाणवेल. म्हणजे थंडी तर लवकर गेलीच पण त्याऐवजी त्या ठिकाणी व काळात अधिकची उष्णता जाणवण्यास लवकरच सुरवात होईल.  उर्वरित मध्य महाराष्ट्रातील नगर पुणे सातारा कोल्हापूर सांगली सोलापूर अशा ६ जिल्ह्यात फेब्रुवारीतील पहाटेचे किमान तापमान सरासरी इतकेच जाणवेल. 

शेतकऱ्यांसाठी विशेष सूचना

महाराष्ट्रात फेब्रुवारी महिन्याचे मासिक पावसाचा अंदाज अगोदरच वर्तवला असुन पावसासंबंधीची अवस्था त्या-त्या वेळी अवगत केल्या जातील. परंतु या महिन्यातील पिकांची काढणीचा निर्णय करतांना शेतकऱ्यांनी हवामानाच्या सुचनांकडेही अवश्य लक्ष द्यावे, असे वाटते. महाराष्ट्रातून थंडी लवकर गेल्यामुळे त्याचा शेतपिकावर परिणाम जाणवेल. सध्या हुरड्यावर आलेली धान्यपिके एकाकी ओढून येऊन परतणीच्या मार्गांवर असतील. त्यामुळे अपेक्षेपेक्षा लवकरच काढणीस येतील. त्याच बरोबर उशिरातील उन्हाळ कांदा लागवड व मागास पेरीतील गहू सारख्या पिकांची भर, झड (यील्ड) कमी राहून हंगामी उतार येणार नाही. मात्र आगाप पिकांवर मात्र याचा विशेष असा कोणताही परिणाम जाणवणार नाही. 

पिकांच्या व्यवस्थापनापासून ते योजनापर्यंत, कृषि विषयक सर्व अपडेट्ससाठी लोकमत Agro चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा…

टॅग्स :शेतीहवामानविदर्भपाऊस