राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस जोरदार हजेरी लावत असून शेतमालाची दाणादाण उडवून दिली आहे. पुढील काही दिवस अवकाळी पावसाचे वातावरण राहणार असल्याचे संकेत यापूर्वीच हवामान विभागाने दिले आहे. नाशिक जिल्ह्यासही मागील दोन दिवस अवकाळी पावसाने झोडपून काढले. या अवकाळी पावसाची शक्यता येत्या 16 मे पर्यंत राहणार असल्याचे संकेत आर एम सी मुंबई यांच्याद्वारे वर्तविण्यात आले आहेत.
मागील आठवड्यात सलग दोन दिवस वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊसनाशिक जिल्ह्यात बरसला. अनेक भागात गारपिट देखील झाली. आता हवामानाचा अंदाज आणि चेतावणी लक्षात घेता नाशिक जिल्ह्यातील एक किंवा दोन ठिकाणी उद्या १४ मे २०२४ रोजी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाट व सोसाट्याचा वारा (३०-४० किमी प्रतितास वेग) वाहण्याची दाट शक्यता आहेत. तसेच दि. १५ व १६ मे २०२४ रोजी हलका ते मध्यम पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आर एम सी मुंबईव्दारे जारी करण्यात आली आहे.
हवामानावर आधारित कृषीसल्ला
हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला व हवामानचा पूर्वानुमानाकरीता मेघदुत व मेघगर्जनेसह पाऊस साठी दामिनी मोबाईल अॅपचा उपयोग करावा. मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाट व सोसाट्याचा वाऱ्यासह हलका ते मध्यम पावसाचा अंदाज लक्ष्यात घेता कापणी/मळणी केलेले पिके, फळे व भाजीपाला, पशुधन, कुक्कुट पक्षी आणि स्वतःचे संरक्षण करा.
सौजन्य
ग्रामीण कृषी मौसम सेवा
कृषि हवामान प्रक्षेत्र विभाग
महात्मा फुले कृषी विद्यापीठ,
विभागीय कृषी संशोधन केंद्र, इगतपुरी
ता. इगतपुरी, जि. नाशिक