Join us

नाशिकला ढगाळ वातावरण, तर त्र्यंबकेश्वर, सुरगाण्यात जोरदार पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2024 7:35 PM

नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली.

राज्यातील मराठवाडा विदर्भात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठं नुकसान केलं असून आज सायंकाळी सहा वाजता सुमारास नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली.

गेल्या काही दिवसांपासून सातत्याने अवकाळी पाऊस हजेरी लावत असून मराठवाडा विदर्भ या परिसरात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना जेरीस आणले आहे. रब्बी हंगामातील अनेक पिकांचे देखील मोठे नुकसान झालं असून शेतकरी सध्या साठवणूक करत असताना दुसरीकडे अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागला आहे. अशातच नाशिक जिल्ह्यातील काही भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह आज सायंकाळी जोरदार  पाऊस झाला.

दरम्यान मुंबई आयएमडी विभागाने काही तासांपूर्वी याबाबत इशारा दिला होता. त्यानुसार येत्या ३-४ तासांत नाशिक, पुणे, सातारा जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी गडगडाटी वादळासह विजांच्या कडकडाटासह आणि ताशी 30-40 किमी वेगाने वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील काही भाग तसेच सुरगाणा तालुक्यातील बाऱ्हे, मनखेड मंडळात मागील सायंकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. यात शेतातील आंबा फळझाडांचे नुकसान झाल्याचे समजते आहे. 

मान्सूनचा पहिला अंदाज

यंदा भारतात सरासरीहून अधिक मान्सून राहण्याची शक्यता आहे, असे भारतीय हवामान विभागाने (IMD) सोमवारी जाहीर केले. जून ते सप्टेंबर महिन्यांमध्ये सामान्य पावसाच्या तुलनेत सरासरी १०६ टक्के पाऊस होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने जाहीर केले.

पीक व्यवस्थापनापासून नियोजनापर्यंत, शेतीच्या सर्व अपडेट्ससाठी लोकमत ऍग्रोच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील व्हा... 

टॅग्स :शेतीहवामाननाशिकतापमानपाऊस