Join us

नाशिक, मुंबईला थंडी तरी विदर्भात पाऊस अन् गारपीट, वाचा हवामान अंदाज 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2024 6:31 PM

२५ ते २७ फेब्रुवारीपर्यंत वादळी पावसासह गारपीट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

गेल्या काही दिवसांपासून तापमान वाढत असताना पुन्हा थंडीने डोके वर काढले आहे. त्याचबरोबर विदर्भासह काही भागात गारपीट होण्याचा हवामान विभागाने दिलेला अंदाज कायम असून नाशिक आणि मुंबईत थंडी वाढण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. तसेच हा थंडी आणखी काही दिवस टिकून राहणार असल्याची माहिती जेष्ठ निवृत्त हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली आहे. 

एकीकडे तापमान वाढत असताना अचानक थंडी जाणवू लागली आहे. शिवाय काही दिवसांपूर्वी विदर्भात गारपीटही झाली. आता पुन्हा हवामान विभागाकडून २५ ते २७ फेब्रुवारीपर्यंत वादळी पावसासह गारपीट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यानुसार विदर्भ व मराठवाड्यातील १३ जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. नागपूरसह भंडारा, गोंदिया, गडचिरोली, अमरावती या पाच जिल्ह्यांमध्ये तीव्रता अधिक राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतातील काढणीला आलेल्या पिकांचे योग्य नियोजन करावे असा इशाराही देण्यात आला आहे. त्यामुळे काल २४ फेब्रुवारीला दिलेला अंदाज कायम असुन मध्य महाराष्ट्रात थंडीची तीव्रता वाढत आहे. 

तसेच मध्य महाराष्ट्रातील जळगांव नाशिक मुंबई पुणे शहरे व लगतच्या जिल्ह्यातील परिसरात किमान व कमाल अशी दोन्हीही तापमाने ही सध्य:काळातील सरासरी तापमानांच्या खाली जवळपास २ डिग्री से.ग्रेड घसरलेले असुन, किमान मुंबईला १९ तर नाशिक, पुणे येथे १० व कमाल ३०-३२ डिग्री से.ग्रेड दरम्यान जाणवत आहे. म्हणून अजूनही थंडी चांगलीच टिकून आहे. शिवाय पुन्हा उद्या रात्री हिमालयीन क्षेत्रात नवीन पश्चिमी झंजावात प्रवेशत आहे. म्हणून अजूनही काही दिवस थंडी चांगलीच टिकण्याची शक्यता जाणवत असल्याचे खुळे यांनी स्पष्ट केले आहे. 

विदर्भासाठी यलो अलर्ट 

दरम्यान हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार, विदर्भ मराठवाडा वगळता उर्वरित राज्यात बहुतांशी ढगाळ वातावरण राहणार आहे. तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. पावसाच्या शक्यतेमुळे विदर्भ व मराठवाड्यात गारठा वाढला असून तापमानाचा पारा घसरला आहे. उद्या 26 फेब्रुवारी रोजी  परभणी, हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली,गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात पावसासह गारपीटीची शक्यता आहे. तर 27 फेब्रुवारी रोजी मराठवाड्यातील हिंगोलीसह संपूर्ण विदर्भात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

पिकांच्या व्यवस्थापनापासून ते योजनापर्यंत, कृषि विषयक सर्व अपडेट्ससाठी लोकमत Agro चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा…

टॅग्स :शेतीहवामानतापमानविदर्भ