Join us

थंडीचा जोर वाढला, द्राक्ष बागा वाचविण्यासाठी काय उपाय कराल?  

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2024 1:17 PM

रब्बी हंगामातील थंडी गहू, हरभरा या पिकांना पोषक असली तरी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मात्र हुडहुडी भरली आहे.

नाशिक : यंदाच्या रब्बी हंगामातनाशिक तालुक्याच्या पूर्व भागात गेल्या आठवडाभरापासून थंडीचा कडाका वाढल्याने वातावरणात बदल झाला आहे. पहाटेच्या सुमारास दाट धुके पडते व दिवसभर थंड वातावरण असल्याने रब्बी हंगामातील थंडी गहू, हरभरा या पिकांना पोषक असली तरी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मात्र हुडहुडी भरली आहे.

पूर्व भागातील एकलहरेगाव, सामनगाव, चाडेगाव, कोटमगाव, मोहगाव, बाभळेश्वर, चांदगिरी, जाखोरी, हिंगणवेढे, कालवी, गंगापाडळी, लाखलगाव, ओढा, शिलापूर, माडसांगती या भागातील द्राक्ष बागा बहरात आल्याने थंडीपासून द्राक्षबागांचे संरक्षण करण्यासाठी विविध उपाययोजना कराव्या लागत आहेत. द्राक्ष साखर उतरण्याच्या अवस्थेत असताना तापमानात घसरण होत असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही, नोव्हेंबर-डिसेंबर या दोन महिन्यांत हलकी थंडी अनुभवायला मिळाली, मात्र गेल्या काही दिवसांपासून तापमानात चढ़- उतार सुरू आहे.

थंडी वाढतच राहिली तर तयार झालेल्या द्राक्षमण्यांना तडे पडू शकतात. अशा कडाक्याच्या थंडीत द्राक्ष बागांना प्लास्टिक पेपरचे आच्छादन करणे, बागांमध्ये पहाटेच्या वेळी पाणी देणे, शेकोटी पेटवून धूर करण्याचे उपाय द्राक्ष उत्पादक शेतकरी करीत आहेत. निर्यातक्षम द्राक्षांचा रंग टिकवण्यासाठी कागदांच्या साहाय्याने द्राक्ष घडांना वेष्टण करून संरक्षण करणे, आदी उपाय शेतकरी करताना दिसून येत आहेत. द्राक्ष उत्पादक शेतकरी रामदास डुकरे पाटील म्हणाले की, निर्यातक्षम द्राक्षांचा रंग टिकून राहण्यासाठी द्राक्षघडांना वेष्टण करावे लागते. रद्दी दहा किलोचा गठ्ठा अडीचशे रुपये प्रमाणे घ्यावी लागते तर मजुरांना एकरी आठ ते दहा हजार रुपये मजुरी द्यावी लागते. एवढे करूनही निसर्गाच्या लहरीपणामुळे द्राक्षे बाजारात जाऊन योग्य भाव मिळेपर्यंत धाकधूक कायम राहते. 

या उपाययोजना करा- जास्त खराब झालेले घड काढून टाकावेत. उर्वरित घडातील खराब मणी काढून फवारणी घ्यावी.- काढलेले घड, मणी शक्यतो बागेच्या बाहेर पुरस्रून टाकावेत. त्यामुळे रोगांचा प्रादुर्भाव करणत्या घटकांची संख्या बागेत कमी होईल.- द्राक्ष बागेतील रोग नियंत्रित ठेवण्यासाठी बागेतील आर्दतेचे प्रमाण कसे कमी होईल याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. बागेत खेळती हवा ठेवल्यास रोगाच्या वाढीला आळा बसेल.- ज्या यागा अजूनही निरोगी व स्वच्छ आहेत, अशा बागांमध्ये रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ट्रायकोडर्मा ऑपिलोमायसिस या जैविक बुरशीनाशकांची 3 दिवसांच्या अंतराने 3  ते 5 मिलि प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी घ्यावी.

पिकांच्या व्यवस्थापनापासून ते योजनापर्यंत, कृषि विषयक सर्व अपडेट्ससाठी लोकमत Agro चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा…

टॅग्स :नाशिकद्राक्षेहवामान