Nashik : एकीकडे नाशिक जिल्ह्यात बहुतांश भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावल्यानंतर नाशिकच्या पश्चिम पट्ट्यातही अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने भात शेतीचे मोठं नुकसान झालं आहे. ऐन भात काढणीची कामे सुरू असताना, काही पीके शेतातच असताना अवकाळी आणि गारपीट झाल्याने भात पिकांना मोठा तडाखा बसला आहे. शेतकऱ्यांच्या तोंडचा घासच हिरावल्याने अनेक शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे.
हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार दोन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात ढगाळ हवामानासह थंडीत वाढ झाली होती. पाऊस येण्याची चिन्हे दिसत होती. आज उशिरा दुपारी चारनंतर नाशिकच्या पश्चिम पट्ट्यात म्हणजेच इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ सुरगाणा आदी भागांत अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. सकाळपासून ढगाळ हवामान होतेच, मात्र सायंकाळी चार वाजेच्या सुमारास विजांचा गडगडाट आणि ढगांच्या कडकडाटात अवकाळीसह गारपिटीला सुरवात झाली. त्यामुळे भात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या सर्व तालुक्यात भात पिकांच्या काढणीची लगबग सुरू असताना पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली.
एकीकडे त्र्यंबकेश्वर, सुरगाणा, इगतपुरी आदी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर भात शेती केली जाते. गेल्या काही दिवसांपासून भात कापणीची कामे सुरू आहेत. अशातच दोन दिवसांपासून ढगाळ हवामान असल्याने शेतकऱ्यांनी भात कापून रचून ठेवले. काहींनी कापलेले भात लागलीच मशिनद्वारे काढून घरी आणले, मात्र काही शेतकऱ्यांना मात्र अवकाळीचा चांगलाच फटका बसला असून ऐन काढणीला आलेले भात पीक पूर्ण पावसात भिजल्याने मोठे नुकसान झाले आहे. एकीकडे यंदा पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने भात पिकाचे उत्पादन घटण्याची शक्यता निर्माण झाली असताना अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने पुन्हा भात शेतीला जोरदार तडाखा बसला आहे.
Crop Damage : नाशिकच्या द्राक्ष पंढरीचा चिखल, अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी पळवलं!
भात शेतीचे मोठे नुकसान
नाशिकच्या पश्चिम पट्ट्यात मोठ्या प्रमाणावर भात शेती केली जाते. यंदा पाऊस चांगला न झाल्याने भात शेतीवर परिणाम झाला होता. उत्पादन घटण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली होती. मात्र दुसरीकडे हाती आलेले पीक काढणीच्या प्रक्रियेत असताना अचानक अवकाळी पावसाने आगमन केली. सुमारे दीड ते दोन तास पावसाची सतंतधार सुरूच होती. यात शेतातील भात पिके पावसाच्या पाण्यात भिजत पडली असून आता हाती येणारे पीकही हाती येणार नसल्याचे शेतकरी सांगत आहेत.