जळगाव : सरासरीपेक्षा अधिक पर्जन्यमान झाल्याने यंदा रब्बी हंगाम (Rabbi Season) बहरणार असून १५ अखेर २३ हजार ५१५ हेक्टरवर लागवड झाली आहे. मध्यंतरी ढगाळ वातारणासह झालेल्या अवकाळी पावसाचा (Unseasonal Rain) काहीअंशी पिकांना फटका बसला आहे. पडणारी थंडी पिकांसाठी पोषक ठरत आहे. तर यंदा पाऊसमान चांगले असल्याने मन्याड आणि गिरणा धरणातून आवर्तन असल्याने (Water Discharged) रब्बी हंगाम जोरावर आहे.
गेल्यावर्षी आभाळमाया चांगलीच बसरल्याने बहुतांशी धरणे ओव्हरफ्लो (Girana dam) झाली. रब्बीच्या पेरण्या जवळपास आटोपल्या असून काही भागात कांदा, खरबूज, टरबूज पिकांची लागवड होत आहे. दि. १७ रोजी गिरणा धरणाचे आवर्तन सोडण्यात आले आहे. गिरणा नदीत जामदा डावा कालवा, जामदा उजवा कालवा व निम्न गिरणा कालव्यातून सोडण्यात आले. गिरणा धरण ओव्हरफ्लो झाल्यास सिंचनासाठी तीन आवर्तने दिली जातात. यंदा तीन आवर्तनाद्वारे एकूण ९ हजार दशलक्ष घनफूट जलसाठा शेतीशिवारांमध्ये खळाळणार आहे.
'गिरणा'च्या आवर्तनाने ५७ हजार हेक्टर ओलिताखाली
यावर्षी गिरणा धरण ओव्हरफ्लो झाल्याने सिंचनासाठी तीन आवर्तने मिळणार आहेत. यातील पहिले १५०० क्युसेकचे आवर्तन २४ डिसेंबर रोजी सोडले गेले. दि. १७ रोजी दुपारी १५०० क्युसेकने पाणी सोडले. नंतर शुक्रवारी ते १०० ने कमी करून १४०० क्युसेक करण्यात आले आहे. चाळीसगावसह पाचोरा, भडगाव, धरणगाव, एरंडोल, पारोळा, अमळनेर व जळगाव या तालुक्यांना फायदा होणार आहे. जळगाव व पाचोरा वगळता उर्वरित सहा तालुक्यांतील ५७ हजार हेक्टर शेती क्षेत्र गिरणेच्या आवर्तनामुळे ओलिताखाली येते.
मन्याड' मधून सिंचनासाठी दोन आवर्तने
चाळीसगाव तालुक्यातील १९ गावांसाठी वरदान ठरलेले मन्याड धरण यंदा उशिरा भरले. यंदा या धरणातून या परिसरातील सिंचनासाठी दोन आवर्तने मिळणार आहे. यामुळे १९ गावांमधील ४ हजार ८६४ हेक्टर क्षेत्र भिजणार आहे. दोन आवर्तने मिळणार असल्याने रब्बी हंगामही बहरणार आहे.
या भागातील रब्बीचा पेरा यावर्षी वाढला आहे. सिंचनासाठीचे पहिले आवर्तन २४ डिसेंबर रोजी सोडण्यात आले. २० क्युसेकचे हे आवर्तन एक ते दीड महिना प्रवाही असते. दुसरे आवर्तन फेब्रुवारीच्या अखेरीस सुटू शकते. चाळीसगाव तालुक्यातील १४ पैकी १२ मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्याने रब्बी हंगामाला फायदा होणार आहे.