जळगाव : दोन दशकांपूर्वी गिरणाखोरे आणि ऊस हे एक अतूट समीकरण होते. "साखरपट्टा" असा गौरवाने उल्लेख केला जायचा. मात्र, सद्य:स्थितीत गेल्या काही वर्षांत ऊस लागवडीचे क्षेत्र आकसले आहे. यंदा तर दुष्काळी वणव्यामुळे जेमतेम लागवड झाली असून पुढील वर्षी तालुक्यातून फारसा ऊस उपलब्ध होणार नाही, असे चित्र आहे. साखर कारखान्याने बंद असल्याचा फटकाही बसत आहे.
गिरणा-मन्याड नद्यांची वाहती धार, पोषक वातावरण, चांगली जमीन, साखर कारखान्याची उपलब्धता या सर्व बाबी ऊस लागवडीसाठी पोषक होत्या. गेल्या काही वर्षांत निसर्गचक्रातही बदल झाल्याने दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीट, महापूर संकटांमुळे शेती व्यवसायासमोर आव्हाने उभी केली आहे. मन्याडच्या पट्ट्यात 22 गावांमध्ये ऊस हे मुख्य पीक होते. आता मात्र परिस्थिती बदलली आहे. उसाला मिळणारे भाव, ऊसतोड, साखर कारखान्यांपर्यंत करावी लागणारी पोहोच, उसाच्या पेमेंटसाठी होणार वेळ हे घटकही शेतकऱ्यांना जेरीस आणतात. या सर्व बाबी ऊस लागवडीच्या मुळावर आल्या आहेत.
यंदा लागवडीखाली अत्यल्प पर्जन्यमानामुळे यावर्षी पाणीबाणीला सामोरे जावे लागत असून पाचशे हेक्टर क्षेत्र तालुक्यात गंभीर दुष्काळ जाहीर झाला आहे. मन्याड धरणात तर थेंबही आला नाही. ग्रामीण भागात अनेक गावे पाणीटंचाईच्या सावटाखाली येत असून ऊस लागवडीवरही याचा मोठा परिणाम झाला आहे. यंदा डिसेंबरअखेरपर्यंत 500 हेक्टर क्षेत्रावर ऊस लागवड झाली आहे. जानेवारी व फेब्रुवारीत हे क्षेत्र वाढणार आहे. साधारणतः अजून 200 हेक्टर क्षेत्र लागवडीखाली येऊ शकते. गेल्या 1682 हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली होती. गेल्यावर्षाच्या तुलनेत 60 ते 70 टक्क्यांनी घटले आहे. 20 वर्षापूर्वी हे क्षेत्र 8 ते 10 हजार हेक्टरपेक्षा जात होते.
बेलगंगा यंदा बंद
परिसरातील हक्काचा साखर कारखाना असणारा बेलगंगा यंदा बंद आहे. गेली काही वर्षे कारखान्याला टाळेच होते. 2019 पूर्वी ते उघडले असले तरी, पुढची वाटचाल अडखळत होत आहे. ऊस उत्पादकांना परजिल्ह्यांतील साखर कारखान्यांना ऊस द्यावा लागतो. यात वाहतुकीचा भुर्दंड त्यांना सहन करावा लागतो. उसाचे बेणे आणि ऊस यांचा भाव जवळपास सारखाच आहे. त्यामुळेही उसाची शेती फारशी परवडत नाही. बेण्याला 2000 ते 2500 रुपये टन असा भाव असून उसालाही त्यापेक्षा शंभर ते दोनशे रुपये फक्त्त अधिकचे मिळतात. त्यामुळे ऊस वाढवून पक्च करण्याऐवजी शेतकरी बेण्यासाठीही त्याची तोड करून टाकतात.