Join us

Weather Update : पेरणीची घाई नको, रोहिणी नक्षत्राचे वाहन उंदीर ओकणार आग? वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2024 5:29 PM

Weather Update : पंचांग शास्त्रातील नक्षत्रनिहाय हवामान अंदाजातील पहिले पावसाचे (Rainy Season) नक्षत्र म्हणजे रोहिणी नक्षत्र होय.

पूर्वी पावसाचा अंदाज खगोलशाखेचा आधार घेऊन सूर्य, चंद्र, ग्रह, तारे याच्या अक्षांश व रेखांशावरून पंचांग शाखांद्वारे वर्तविला जात होता. पंचांग शास्त्रातील नक्षत्रनिहाय हवामान अंदाजातील (Weather Forecast) पहिले पावसाचे नक्षत्र म्हणजे रोहिणी नक्षत्र होय. या नक्षत्राला २४ मे रोजी मध्यरात्रीनंतर सुरुवात झाली आहे; मात्र वाहन उंदीर आहे. यावरून पाऊस  (Rain)अल्प होणार असल्याचे संकेत दिले जात आहेत. 

पंचांग शास्त्राद्वारे हवामान अंदाज वर्तविण्याची ही हजारो वर्षांपासूनची एक शास्त्रीय परंपरा आहे. पाऊस येण्याच्या चार महिने आधीच खगोल शास्त्राआधारे त्याचा अंदाज वर्तविण्याची कला फक्त भारतातच अवगत होती. त्यामुळे अनेक शेतकरी आजही पंचांगाद्वारे वर्तविल्या जाणाऱ्या हवामानाच्या अंदाजावर विश्वास  ठेवून असतात. पंचांग शास्त्र हवामानाचा अंदाज वर्तविताना गणित (Mathematics) शास्त्राचाही वापर करते. या गणित शास्त्राचा उपयोग करून सर्व नक्षत्रांची वाहने कोणती हे ठरविली जाते. कारण ग्रह, तारे, नक्षत्रासोबत नक्षत्राचे वाहन हे सुद्धा पावसाचे प्रमाण दर्शविण्यास साहाय्यक ठरते. 

यानुसार या रोहिणी नक्षत्राचे वाहन उंदीर आहे. सूर्य २४ मे रोजीच्या मध्यरात्रीनंतर पहाटे ३ वाजून १६ मिनिटांनी रोहिणी नक्षत्राने प्रवेश केला. त्यानुसार हे वाहन या नक्षत्रातील पेरणी योग्य पावसाला अनुकूल नाहीत; मात्र नक्षत्राच्या प्रथम चरणात वादळवाऱ्यासह पाऊस येण्याची दाट शक्यता आहे. साधारणतः २५ ते ३१ मेच्या दरम्यान, दुपारनंतर केव्हाही वादळी वाऱ्यासह पाऊस येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे; मात्र हे पावसाळी वातावरण फार काळ टिकणारे नसेल. बियाणांच्या महागाईचा विचार करता धूळ पेरणीची घाई करू नये. शेतकरी वर्गाने हवामानाचा ताजा अंदाज घेऊन आपल्या भागातील शेतीचे व पेरणीचे नियोजन करणे गरजेचे आहे.

जमिनीत ओलावा असणे आवश्यक

मंडळ अधिकारी विजय पत्रे म्हणाले की, पेरणी करण्यापूर्वी जमिनीत ओलावा असणे आवश्यक आहे. अन्यथा कोवळी रोपटी कोमेजण्याचा धोका असते. शेतकऱ्यांना दुबार पेरणी करण्याची पाळी येऊ शकते. आता हवामान शास्त्राचे तंत्र विकसित झाले आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पिकांची पेरणी करावी. तर शेतकरी तुळशीराम गोहणे म्हणाले की, अंदाज बांधणे गरजेचे असल्याने शेतकरी नक्षत्रानुसार कामे उरकण्यासाठी लगबग करीत असतात. मागील वर्षात जिल्ह्यात आवत्याचा "पेरा अधिक होता. मजुरीत वाढ लक्षात घेता आवत्या शेती करण्याकडे शेतकऱ्यांचा अधिक कल आहे.

धानासाठी मोठ्या प्रमाणात पावसाची गरज

जिल्ह्यात प्रामुख्याने धानासह कापूस व सोयाबीन पिकाची लागवड केली जाते; मात्र धानाचे क्षेत्र अधिक असते. धानाच्या शेतीसाठी पावसाचा अंदाज बांधणे गरजेचे असल्याने शेतकरी नक्षत्रानुसार कामे उरकण्यासाठी लगबग करीत असतात. मागील वर्षात जिल्ह्यात आवत्याचा पेरा अधिक होता. पावसाने बऱ्यापैकी साथ दिली होती. मजुरी दरातील वाढ व उत्पन्नासाठी लागणारा खर्च लक्षात घेता आवत्या पद्धतीने शेती करण्याकडे शेतकऱ्यांचा अधिक कल असल्याचे दिसून येते.

टॅग्स :शेतीशेती क्षेत्रलागवड, मशागतभातपाऊस