Join us

Girana Dam : गिरणा धरणात एकाच दिवसात पाच टक्क्यांची वाढ, आज किती पाणीसाठा? 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2024 3:33 PM

Girana Dam : जळगाव जिल्ह्यातील दमदार पावसामुळे एका दिवसातच गिरणा धरणाच्या जलसाठ्यात ५ टक्क्यांची वाढ झाली आहे.

जळगाव : जिल्ह्यात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे जिल्ह्यातील लहान- मोठ्या प्रकल्पांमधील जलसाठ्यात (Water Storage) वाढ होत आहे. हतनूर धरणातून ४६ हजार १५७ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून, दुसरीकडे गिरणा धरणातील जलसाठ्यातदेखील वाढ होत आहे. एका दिवसातच गिरणा धरणाच्या (Girana Dam) जलसाठ्यात ५ टक्क्यांची वाढ झाली आहे.

शनिवारी गिरणा धरणातील जलसाठा १५ टक्के इतका होता. तर रविवारी सायंकाळी ४:३० वाजेपर्यंत हा जलसाठा २०.१७ टक्क्यांवर पोहोचला होता. विशेष म्हणजे रविवारी दुपारी २ वाजेपर्यंत हा साठा १७ टक्के इतका होता. तीन तासातच गिरणेच्या जलसाठ्यात ३ टक्क्यांची वाढ झाली होती. चार दिवसांपूर्वी १२ टक्के असलेला गिरणेतील जलसाठा 25.95 टक्क्यांवर पोहोचला आहे. जळगाव जिल्ह्यातील एकूण जलसाठ्यांमधील सरासरी २९ टक्क्यांवर पोहोचली आहे. मंगरूळ, सुकी ही धरणं आधीच ओव्हरफ्लो झाली आहेत.

गिरणेचा जलसाठा ३० टक्क्यांपर्यंत जाणार ..?

नाशिक जिल्ह्यात जोरदार पाऊस होत असल्याने गिरणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील धरणातून गिरणा धरणात मोठ्याप्रणात पाण्याचा विसर्ग होत आहे. त्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ होताना दिसत आहे. गिरणा धरणात चणकापूर, हरणबारी या धरणांमधून पाण्याचा विसर्ग होत असतो. हरणबारी धरण ९० टक्के भरले आहे. तर चणकापूर धरणदेखील ६४ टक्के भरले आहे. दरम्यान, नाशिक जिल्ह्यात अजून काही दिवस दमदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात गिरणेतील जलसाठ्यात ३० टक्क्यांपर्यंतची वाढ होण्याचा अंदाज आहे.

हतनूर धरणाचे १२ दरवाजे उघडे....जळगाव जिल्ह्यासह मध्य प्रदेशातही चांगला पाऊस होत असल्यामुळे हतनूर धरणाच्या जल- साठ्यातदेखील वाढ होत आहे. यामुळे हतनूर धरणाचे १२ दरवाजे उघडले असून, त्यातून ४६ हजार १५७ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे तापी नदी दुथडी भरून वाहत आहे. हतनुरसह वाघूर धरणातील जलसाठा ६४ टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्यावर्षी ४ ऑगस्टपर्यंत हा जलसाठा ५६ टक्क्यांवर होता.

टॅग्स :गिरणा नदीजळगावशेती क्षेत्रशेतीधरण