Join us

Girana Dam : गिरणातून चार-पाच आवर्तन मिळणार, दोन महिन्यापासून विसर्ग, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2024 16:14 IST

Girana Dam : ऑक्टोबर महिन्यात धरणातील विसर्ग हा थांबविण्यात येत असतो. मात्र, नोव्हेंबर महिन्याचे १५ दिवस उलटूनही धरणातून यंदा विसर्ग सुरू आहे. 

जळगाव : यंदा जिल्ह्यासह राज्यात झालेल्या दमदार पावसामुळे (Heavy Rain)  सर्वच प्रमुख प्रकल्पांमध्ये १०० टक्के जलसाठा जिल्ह्यातील सुमारे ५२ हजार हेक्टर क्षेत्रावरील सिंचनासाठी महत्वपूर्ण ठरणाऱ्या गिरणा धरणातही १०० टक्के साठा असून, गेल्या दोन महिन्यांपासून सतत पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पावसाळा संपल्यानंतर ऑक्टोबर महिन्यात धरणातील विसर्ग हा थांबविण्यात येत असतो. मात्र, नोव्हेंबर महिन्याचे १५ दिवस उलटूनही धरणातून यंदा विसर्ग सुरू आहे. 

गिरणा धरणात (Girana Dam) १५ सप्टेंबर रोजी १०० टक्के जलसाठा झाला होता. त्यानंतर धरणातून विसर्ग (water Discharged) सोडण्यास सुरुवात झाली. यंदा सर्वाधिक विसर्ग हा १९ हजार क्युसेकपर्यंत सोडण्यात आला होता. त्यानंतर ७ ते ९ हजार क्युसेकपर्यंतचा विसर्ग ऑक्टोबर महिन्यात अनेक दिवस कायम होता. मात्र, धरणात येणारी आवक कमी होताच, धरणातून सोडण्यात येणाऱ्या विसर्गाचे प्रमाण हळूहळू कमी करण्यात आले. सध्यस्थितीत धरणातून १ हजार २३८ क्युसेक एवढा पाण्याचा विसर्ग सुरु आहे. तर धरणाचा आता केवळ एक दरवाजा उघडा आहे.

येत्या दोन दिवसात बंद होणार विसर्ग गिरणा पाटबंधारे विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार गिरणा धरणात पाणलोट क्षेत्रातून अजूनही काही प्रमाणात पाण्याची आवक ही सुरुच आहे. त्यात गिरणा धरणही १०० टक्के भरले असल्याने, धरणातून विसर्ग कायम ठेवण्यात आला आहे. दरम्यान, येत्या दोन दिवसात धरणात होणारी आवक बंद होऊ शकते. त्यानंतर गिरणा धरणातून सुरु असलेला विसर्गही बंद करण्यात येईल अशी माहिती गिरणा पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली आहे.

चार महिन्यांपासून गिरणा वाहतीच... दमदार पाऊस झाल्यानंतर जुलै महिन्यापासून गिरणा नदी सातत्याने वाहत आहे. त्यातच धरणातूनही पाण्याचा विसर्ग सुरु असल्यामुळे गिरणेला चांगले पाणी असून, ते वाहतं आहे. रब्बी हंगामात चार ते पाच पाण्याचे आवर्तन मिळतात. मात्र, निवडणुकांमुळे अद्याप कालवा समितीची बैठक झालेली नाही. दरम्यान, यंदा गिरणा धरणातील जलसाठा पाहता, नेहमीप्रमाणे चार ते पाच आवर्तनं मिळू शकणार आहेत.

हेही वाचा : Jayakwadi Dam : जायकवाडी धरणात १११ टीएमसी पाण्याची आवक; गोदापात्रात केला ३० टीएमसी पाण्याचा विसर्ग

टॅग्स :गिरणा नदीशेती क्षेत्रशेतीजळगावनाशिक