नाशिक :गंगापूर कालव्याचे (Gangapur Canal) दुरुस्तीचे काम गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील आवर्तन उशिरा मिळण्याची दाट शक्यता होती; परंतु पाटबंधारे विभागाने शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील (Rabbi season) आवर्तनाबाबत होणारा विलंब लक्षात घेऊन तात्काळ रब्बी हंगामातील पहिले आवर्तन गंगापूर कालव्याला सोडल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
गंगापूर कालव्यावर नाशिक तालुक्यातील (Nashik Taluka) बहुतांश द्राक्षबागांचे भवितव्य कालव्याच्या पाण्यावर अवलंबून आहे. तालुक्यातील अनेक गावांतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही अनेकदा निर्माण होत असतो. अनेक गावांतील पिण्याच्या पाण्याचे तळे हे गंगापूर कालव्याला पाणी सुटल्यानंतर भरून घेतले जातात. त्यामुळे खेडेगावातील नागरिकांची पाण्याबाबत गैरसाय होत नाही.
रब्बी हंगामातील शेतीपिके गंगापूर कालव्याच्या पाण्यावर अवलंबून असतात. रब्बी हंगामामध्ये प्रामुख्याने गहू, उन्हाळी कांदा, हरभरा आदींसह मोठ्या प्रमाणावर भाजीपाला पिकवला जातो. त्यामुळे गंगापूर कालव्याला रब्बी हंगामातील पहिले सुटल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. गेल्या काही दिवसांपासून आवर्तन नसल्याने शेतकऱ्यांचे पाण्यावाचून हाल होत होते. पाणी आल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
रब्बी हंगामातील पाहिले आवर्तन गंगापूर कालव्याला पाटबंधारे विभागाने सोडल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. गंगापूर कालव्यावर आधारित सिद्ध पिंप्री, आडगाव, विंचूर गवळी, माडसांगवी, शिलापूर, खेरवाडी, दिक्षी, कसबे सुकेणे, दात्याणे, गिरणारे, दुगाव, मातोरी आदी गावांतील शेतीपिकांना दिलासा मिळाला आहे.- भाऊसाहेब ढिकले, सरपंच (सिद्ध पिप्री)