Nashik Dam Storage : सप्टेंबरच्या शेवटी पावसाने (Heavy rain) चांगलाच धुमाकूळ घातला, मात्र गेल्या तीन दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे धरणे मजबूत स्थितीत असून विसर्ग देखील घटविण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यातील १३ धरणांतून विसर्ग सुरूच असून, गंगापूर धरणासह (Gangapur Dam) १५ धरणे फुल्ल भरली आहेत.
गेल्या सहा दिवसांत परतीच्या पावसाने नाशिकला चांगलेच झोडपले. त्यात सर्वाधिक पाऊस त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) तालुक्यात पडला. धरणक्षेत्रात झालेल्या पावसामुळे प्रमुख धरणांमधील साठाही १०० टक्क्यांवर पोहोचला आहे. काश्यपी, आळंदी, करंजवन, गंगापूर, वाघाड, ओझरखेड, दारणा, भावली, वालदेवी, भोजपुरी, हरणबारी, केळझर, गिरणा, माणिकपुंज या धरणांमधून अद्यापही विसर्ग सुरूच असून, पावसाने विश्रांती घेतल्याने आता विसर्गही हळूहळू कमी होणार असल्याची समजते आहे.
अठरा धरणांमधून विसर्ग दारणा धरणातून १२५०, कडवातून १२३०, वालदेवीतून ३०, आळंदीतून ३७, भावलीतून २०८, गंगापूरमधून ११६९, होळकर पुलाखालून १४४६, वाघाडमधून २२९, नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यातून ५५६७, कश्यपीतून ३२०, करंजवनमधून १५१, भोजापूरमधून १५४०, ओझरखेडमधून ६८, पुणेगावमधून ५०, तिसगाव ४४, पालखेडमधून ८५२ इतका विसर्ग सुरू आहे.
कसा आहे जिल्ह्यातील पाणीसाठा
दरम्यान गंगापूर धरण पूर्णपणे भरले आहे. त्याशिवाय काश्यपी, गौतमी गोदावरी, आळंदी, करंजवन, वाघाड, ओझरखेड तिसगाव, दारणा, भावली, वालदेवी, भोजापूर, हरणबारी, केळझर, गिरणा, माणिकपुंज ही धरणेही शंभर टक्के भरली आहेत. पालखेड ८९.४३, पुणेगाव ९८.८८, मुकणे ९६.४९, कडवा ९७.६३, नांदूर मध्यमेश्वर ९१, चणकापूर ९८.४३, नागासाक्या ५७.४३, पुनंद ९ ७.७८ टक्के भरले आहे.