Join us

Girana Dam : गिरणा धरण दोन वर्षांनंतर ओव्हरफ्लो, धरणाचे सहा दरवाजे उघडले! 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2024 2:53 PM

Girana Dam : निम्म्या जळगाव जिल्ह्याची सिंचनासह पिण्याच्या पाण्याची तहान भागवणाऱ्या गिरणा धरण दोन वर्षांनंतर ओव्हरफ्लो झाले आहे.

जळगाव : निम्म्या जळगाव (Jalgaon) जिल्ह्याची सिंचनासह पिण्याच्या पाण्याची तहान भागवणाऱ्या गिरणा धरण (Girna Dam) दोन वर्षांनंतर ओव्हरफ्लो झाले आहे. गतवर्षी दुष्काळाचे चटके गिरणालाही बसले होते. त्यावेळी धरण केवळ ५६ टक्केच भरले होते. यंदा मात्र गिरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे गिरणाचे चांगभलं झाले असून, सध्यस्थितीत प्रकल्पातील जलसाठा हा ९४.०८ टक्क्यांवर गेला आहे. 

परिणामी, पाटबंधारे विभागाने धरणातील ६ दरवाजे उघडले आहे. त्यानुसार २८ रोजी दुपारी १२ वाजता धरणाचे एक गेट ३० सेंमीने उघडून ११८८ क्युसेक पाण्याचा विसर्ग गिरणा नदीपात्रात सोडण्यात आला होता. रात्री ९ वाजता हाच विसर्ग ११८८ क्युसेकवरून २३७६ क्युसेक करण्यात आला. गिरणा धरणात येणारी पाण्याची आवक पाहता गुरुवार २९ रोजी सकाळी ६ वाजता विसर्गात वाढ होऊन तो २३७६ क्युसेकवरून ४७५२ क्युसेक करण्यात आला. 

तसेच २ वक्रद्वार ६० सेंमीने उघडण्यात आले. त्यानंतर तीन तासांतच सकाळी ९ वाजता गिरणा प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग ४७५२ क्युसेकवरून थेट ७१२८ क्युसेक करण्यात आला आहे. परिणामी धरणाचे १ ते ६ दरवाजे प्रत्येकी ३० सेमीने उघडण्यात आले आहे. दुपारी १२.३० वाजता गिरणा धरणातून विसर्ग ७१२८ क्युसेकवरून ९५०४ क्युसेक करण्यात आला. वक्रद्वार क्र. १ व ६ प्रत्येकी ६० सेंमी तर वक्रद्वार क्र. २.३,४ व ५ हे प्रत्येकी ३० सेमीने उघडण्यात आले. 

सायंकाळी ६ वाजता गिरणा धरणातून विसर्ग ९५०४ क्युसेकवरून ११ हजार ८८० क्युसेक करण्यात आला. वक्रद्वार १,२,५ व ६ प्रत्येकी ६० सेमी तर वक्रद्वार क्र. ३ व ४ प्रत्येकी ३० सेंमीने उघडण्यात आले. त्यामुळे सतर्कतेचा इशाराही पाटबंधारे विभागाने दिला आहे. यंदा गिरणा धरण भरल्यामुळे नागरिकांमध्ये आनंद व्यक्त होत आहे.

टॅग्स :पाऊसहवामानधरणगिरणा नदीशेती क्षेत्र