Join us

Gosekhurd Dam : गोसेखुर्दचा विसर्ग वाढवला, वैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली, वाचा सविस्तर  

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2024 18:14 IST

Gosekhurd Dam : मुसळधार पावसाने वैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून गोसेखुर्द धरणाचे ३३ दरवाजे उघडण्यात आले आहेत.

गडचिरोली : विदर्भातील गोंदिया, भंडारा, गडचिरोली जिल्ह्यात पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली आहे. सलग दोन दिवसांच्या मुसळधार पावसाने वैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून गोसेखुर्द धरणाचे (Gosekhurd Dam) ३३ दरवाजे उघडण्यात आले आहेत. जवळपास २ लाख २० हजार क्युसेकने विसर्ग सुरु असल्याने वैनगंगा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

गेल्या अनेक दिवसांपासून विदर्भातील (Vidarbha Rain Update) गडचिरोली. गोंदिया, भंडारा आदी जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र पुन्हा पावसाने जोरदार आगमन केल्याने नद्यांना पूर आला आहे. दक्षिण गडचिरोलीला अतिवृष्टीने झोडपून काढले. यामुळे आलापल्ली- भामरागड महामार्गासह जिल्ह्यातील एकूण १२ रस्ते पाण्याखाली गेली. परिणामी जनजीवन विस्कळीत झाले. त्यामुळे आपत्ती निवारण पथकाची दिवसभर धावपळ उडाली. अनेक घरांमध्ये पाणी शिरले, रुग्णांचे हाल झाले, यावेळी बचाव पथकाच्या माध्यमातून मदत करण्यात आली. 

दरम्यान गोसेखुर्द धरणातून वैनगंगा नदीत 02 लाख 20 हजार क्युसेकने विसर्ग, चिचडोह धरणातून 2.19 लक्ष क्युसेकने विसर्ग, सरस्वती धरणातून गोदावरी नदीत 0.08 लक्ष क्युसेकने विसर्ग, मेडीगड्डा धरणातून गोदावरी नदीत 4.6 लक्ष  क्युसेकने विसर्ग सुरू आहे. तर गोसेखुर्द धरणाचा विसर्ग वाढण्याची शक्यता असून गडचिरोली जिल्ह्यातील वैनगंगा वर्धा, प्राणहिता गोदावरीला या प्रमुख नद्यांना पूर आला आहे. तर इंद्रावती नदीने चिदनान व पत्तागुडम येथे धोक्याची पातळी ओलांडली आहे. प्रशासनातर्फे गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

गोसेखुर्दच्या पाणलोट क्षेत्रात धापेवाडा, नवेगाव खैरी, तोतलाडोहकडून अधिकचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांनी खबरदारी घ्यावी. पुराचे पाणी वाढत असेल किंवा नदी नाल्यांना पूर असल्यास कोणी आवागमन करू नये व धोका पत्करू नये. पूरग्रस्त भागात प्रशासन मदतीसाठी सर्वतोपरी प्रयत्नशील आहे. अफवांवर विश्वास ठेवू नये. - संजय दैने, जिल्हाधिकारी

टॅग्स :विदर्भगोसेखुर्द प्रकल्पहवामानपाऊसशेती क्षेत्र