अकोला : यंदा हंगामात पाऊस सरासरी पेक्षा कमी झाल्याने खरीप पिकांना फटका बसलाच, शिवाय रब्बी पिकांना देखील नुकसान सहन करावे लागत आहे. त्यातच आता हरभरा काढणीला आला आहे. मात्र अवकाळीच्या धास्तीने शेतकरी चिंतेत असून दुसरीकडे मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. अवकाळीच्या तडाख्यात अडकण्याआधी हरभरा काढणीच्या कामाला शेतकऱ्यांनी गती दिल्याचे दिसत आहे.
यंदा खरीपामध्ये शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसल्याने शेतकऱ्यांची भिस्त रब्बी हंगामावर होती. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी सोयाबीननंतर हरभऱ्याची लागवड केली होती. त्यामुळे यावर्षी हरभऱ्याचे क्षेत्र समाधानकारक असून मात्र अवकाळीचा धोका कायम असल्याने हरभरा उत्पादकांच्या चिंतेत भर पडली आहे. अशातच हरभरा सोंगणीला जोर आला असून अकोला जिल्ह्यातील काही भागात अवकाळीने हजेरी लावल्याने इतर शेतकरी धास्तावले आहेत. त्याचबरोबर अनेक रब्बी पिकांची काढणी सुरु झाल्याने मजूरही मिळेनासे झाले आहेत.
दरम्यान हंगामात सोयाबीन, तूर, मूग आणि उडीद या पिकांची सर्वाधिक पेरणी होते; तर रब्बी हंगामात हरभरा या पिकांवर शेतकऱ्यांचा अधिक भर दिला. ही पारंपरिक पिके मात्र दरवर्षीच नैसर्गिक संकटांच्या तडाख्यात सापडून शेतकऱ्यांना प्रचंड नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. यंदाही तशीच स्थिती उद्भवली असून कडक ऊन तापणाऱ्या फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात अनेक परिसरातील सर्वदूर उगाळ वाताबरण निर्माण झाले आहे. 15 फेब्रुवारीला अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस कोसळून गहू, हरभरा या पिकांसह पिकांची हानी झाली. यामुळे धास्तावलेल्या शेतकऱ्यांनी पिके सोंगुण घेण्यासाठी धावपळ सुरू केली आहे.
अवकाळीमुळे झाकण्याची लगबग
सध्या हरभरा काढण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या यंत्राची बुकिंग झालेली आहे. त्यामुळे ते सहज उपलब्ध होणे कठीण झाले आहे. जोपर्यंत थ्रेशर उपलब्ध होत नाही. तोपर्यंत सोंगलेला हरभरा सुड़ी मारून व्यवस्थितरीत्या झाकूने ठेवावा लागतो. शेतमाल झाकण्यासाठी प्लास्टिक पन्नी किवा ताडपत्री गरजेची असून ती खरेदी करण्यासाठी शेतकऱ्याची बाजारपेठेत गर्दी होत असल्याचे दिसत आहे. हरभऱ्याला दर चांगले असल्याने शेतकऱ्यांची घाई सुरू आहे.
मजुरांची वाणवा
गव्हाचा खर्च आणि मशागत जास्त पण भाव कमी असल्याने हरभऱ्याकडे शेतकरी वळले आहे. शेतशिवारातील बहुतांश हरभरा वाळला असन सर्वराणीला वेग आला आहे. वातावरण बदलले असून अवकाळीचा धोका असल्याने सवंगणीची लगबग चालविली आहे. एकरी २ हजार ७०० रुपये या मजुरांना दिला जात आहे. हरभऱ्याची सवंगणी करून त्याचा ढीग लावण्याची जबाबदारी त्यांच्याकडे असल्याने ते सकाळपासून या कामात व्यस्त दिसत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून तुळजापूर, वाघाळा, चानकी, हमदापूर या गावांमध्ये यवतमाळ, चंद्रपूर या जिह्यातील महिला मजुरांच्या टोळ्या येत असतात. यातून त्यांना सुद्धा चांगली मिळकत होत असल्याने समाधान व्यक्त केले जाते.