राज्यातील एकीकडे उष्णतेची लाट आली असताना काही भागात किरकोळ पावसाचा अंदाज देखील वर्तविण्यात आला आहे. आता महाराष्ट्रातील 29 जिल्ह्यात आज आणि उद्या ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी अगदीच किरकोळ पावसाचा अंदाज जेष्ठ निवृत्त हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला आहे.
कुठे अवकाळीचे वातावरण-
मुंबईसह कोकण वगळता महाराष्ट्रातील २९ जिल्ह्यात आज व उद्या (२९-३० मार्चला) दोन दिवस ढगाळ वातावरणासहित तुरळक ठिकाणी अगदीच किरकोळ पावसाची शक्यता जाणवते.
कुठे उष्णतेची लाट-
विदर्भातील ११ जिल्ह्यात आज व उद्या (२९-३० मार्चला) दोन दिवस भाग बदलत उष्णतेच्या लाटेची शक्यता जाणवते. संपूर्ण विदर्भ व मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील भाग बदलत काही ठिकाणी दुपारी ३ चे कमाल तापमान हे ४० ते ४२ डिग्री से. ग्रेड च्या श्रेणीत जाणवत असुन ते सरासरी कमाल तापमानापेक्षा ३ ते ४ डिग्रीने अधिक आहे.
रात्रीचा उकाडा-
मुंबईसह कोकण वगळता महाराष्ट्रातील २९ जिल्ह्यात आज व उद्या (२९-३० मार्चला) दोन दिवस दिवसा चांगलीच उष्णतेची काहिली तर रात्री उकाडा जाणवू शकतो. तसेच मुंबईसह कोकणातील ७ जिल्ह्यात तसेच लगतच्या गोवा व गुजराथ राज्यात आज व उद्या (२९-३० मार्चला) दोन दिवस दिवसा दमटयुक्त उष्णतेचा अनुभव येईल.
लेखक : जेष्ठ निवृत्त हवामान तज्ञ माणिकराव खुळे