Join us

Maharashtra Rain Update : राज्यात काही ठिकाणी मुसळधार, काही भाग कोरडाच, सर्वदूर पाऊस कधी? 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2024 5:11 PM

Maharashtra Rain : सध्या राज्यातील काही निवडक जिल्ह्ये सोडले अनेक जिल्ह्ये आजही जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

Maharashtra Rain : सध्या राज्यातील काही निवडक जिल्ह्ये सोडले अनेक जिल्ह्ये आजही जोरदार पावसाच्या (rain Update) प्रतीक्षेत आहेत. एकीकडे जुलै महिन्याचा पहिला आठवडा संपला तरीही अद्याप समाधानकारक पाऊस नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. जेष्ठ निवृत्त हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांच्या हवामान अंदाजानुसार राज्यात पावसासाठी (Monsoon) अनुकूल वातावरण असून येत्या काही दिवसात अनेक भागात पावसाची शक्यता आहे.                पावसासाठी सध्याच्या मुख्य प्रणाल्या अजूनही अनुकूलतेत कायमच आहेत. पुढील ४ दिवस म्हणजे शनिवार दि.१३ जुलै पर्यन्त कोकणात अतिजोरदार, विदर्भात जोरदार, तर खान्देश, नाशिक (Nashik), नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, जिल्ह्यात मध्यम ते जोरदार व मराठवाड्यातील जिल्ह्यात किरकोळ पावसाची शक्यता जाणवते. 

रविवार १४ जुलै पासून त्यापुढील ४ दिवस म्हणजे गुरुवार दि. १८ जुलैपर्यंत मराठवाड्यासहित संपूर्ण महाराष्ट्रात सध्याच्या तेथील पावसापेक्षा अधिक पावसाची शक्यता कायम जाणवते. विशेषतः सिंधुदुर्ग,  सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता अधिक जाणवते. 

अजुन पाच दिवस जावयाचे आहे. १५ जुलैपर्यंत बक्कळ ओलीवर अजूनही खरीपाच्या चांगल्या पेरण्या होवु शकतात. बाठर ओलीवर केलेल्या अति- आगाप पेरण्यां केवळ एमजेओच्या प्रणालीतून झालेल्या किरकोळ पावसामुळे कश्या-बश्या जरी सध्या तग धरून उभ्या असल्या तरी तो निर्णय अति-घाईचाच होता, असेही आज वाटते. त्यावेळी पेरीसंबंधी केलेले आवाहन खरे ठरु पाहत आहे, असे वाटते. 

- माणिकराव खुळे Meteorologist (Retd.)IMD Pune

टॅग्स :पाऊसहवामानमोसमी पाऊसमुंबई मान्सून अपडेटशेती क्षेत्र