- संजय सोनार
Girna Dam : जळगाव जिल्ह्यासाठी वरदान ठरलेल्या गिरणा धरणाच्या (Girna Dam) कार्यक्षेत्रात चांगला पाऊस होत असल्याने गिरणा धरण गुरुवारी १२ रोजी सायंकाळी ६ वा १०० टक्के भरले आहे. सन १९६१ पासून ते आतापर्यंत एकूण १३ वेळा शंभर टक्के भरले आहे. गिरणा धरणावर एकूण १७४ गावे पिण्याचे पाणी व शेतीसाठी तसेच शंभरापेक्षा अधिक पाणी पुरवठा योजना अवलंबून आहेत. त्यामुळे या पाणी योजना आणि गावातील सिंचनाचा प्रश्न मिटला आहे.
गिरणा धरणामुळे जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील चाळीसगाव, भडगाव, एरंडोल, धरणगाव, अमळनेर व पारोळा व जळगाव तालुक्यातील काही भागातील सुमारे ५२ हजार २०९ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येते. या धरणावर अवलंबून असणाऱ्या चार नगरपालिका व इतर गावांचा पिण्याच्या पाणी प्रश्न सुटला आहे. गिरणा धरणात गेल्या ५२ टक्के तर जून २०२४ मध्ये केवळ ११ टक्के इतकाच जलसाठा होता. मात्र गेल्या महिन्यापासून नाशिक जिल्ह्याच्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस सातत्याने झाला.
चणकापुर, पुनद, केळझर, हरणबारी धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरु आहे. तर गिरणा धरणाचा एक दरवाजा ३० सेमीने उघडा करून त्यातून ११८८ क्यूसेस पाणी नदीत सोडण्यात आले आहे. गिरणा धरणातून वाढीव पुराचे पाणी गिरणा नदीत सोडण्यासाठी धरणाचे दरवाजे आवश्यकेनुसार उघडण्यात येतील, त्यामुळे गिरणा नदीला पूर येईल, नदी काठावरील गावांनी सतर्क राहावे. - हेमंत पाटील, माजी अभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग, चाळीसगाव
गिरणा धरणातून पिण्यासाठी ५ आवर्तन तर शेतीसाठी कालव्यातून ३ येळा आवर्तन सोडण्यात येणार आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे जिल्ह्यातील व मालेगाव परिसरातील पाणी प्रश्न सुटला आहे. -विजय जाधव, अभियंता गिरणा पाटबंधारे विभाग, चाळीसगाव.
१३ वेळा भरले धरण गिरणा धरणाचा १०० टक्के भरल्याचा इतिहास पाहिला असता ०६ ऑक्टोबर १९७३, २६ सप्टेंबर १९७६, ११ ऑक्टोबर १९८०, ११ ऑक्टोबर १९९४, ६ ऑक्टोबर २००४, २ ऑगस्ट २००५, २३ सप्टेंबर २००६, १५ सप्टेंबर २००७, १७ सप्टेंबर २०१९, १६ सप्टेंबर २०२०, ३० सप्टेंबर २०२१, १५ सप्टेंबर २०२२, १२ सप्टेंबर २०२४ या तारखांना गिरणा धरण शंभर टक्के भरले आहे.