Jayakwadi Dam : मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी असून जायकवाडी धरण (Jayakwadi dam) लवकरच शंभर टक्के होण्याच्या मार्गावर आहे. आजमितीस जायकवाडी धरण ९५ टक्के भरले असून पावसाची संततधार सुरूच राहिल्यास पुढच्या काही दिवसांत धरण १०० टक्के भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना इशारा देण्यात आला आहे.
ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात आणि सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मराठवाडा आणि विदर्भात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. जून-जुलै महिन्यात पावसाने संथगतीने हजेरी लावली होती. त्यामुळे धरणे भरतील का नाही? अशी शक्यता होती. मात्र ऑगस्ट महिन्यात पावसाने दमदार हजेरी लावण्यास सुरवात केली. काही दिवसांची विश्रांती सोडता पावसाची संततधार कायम होती. त्यामुळे राज्यातील धरणांमध्ये झपाट्याने वाढ झाली. मात्र विदर्भ आणि मराठवाड्यातील धरणे पावसाच्या प्रतीक्षेत होती.
अशा स्थितीत ऑगस्ट महिन्याच्या शेवटी आणि सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मराठवाडा, विदर्भात पावसाने धुमाकूळ घातला. अक्षरश पुरामुळे शेतीपिकांचे नुकसान झाले. घरांची पडझड झाली. वित्तहानी झाली. दुसरीकडे मराठवाडा विदर्भातील धरणांच्या पाणी पातळीत झपाट्याने वचध झाल्याचे दिसून आले आहे. यात जायकवाडी धरणाने शंभरीकडे वाटचाल सुरु केली आहे. नाशिक- नगरहून येणाऱ्या पाण्यामुळे, तसेच दैनंदिन होणाऱ्या पावसामुळे धरण पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. आजमितीस धरणात ९५ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.
कोणत्याही क्षणी विसर्ग दरम्यान जायकवाडी धरणातून कोणत्याही क्षणी विसर्ग करण्यात येऊ शकतो अशी माहिती जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली आहे. जवळपास तीन तालुक्यातील गावांना यापूर्वीच इशारा देण्यात आला आहे. तसेच नदीकाठच्या गावांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जायकवाडी धरण शंभरीकडे वाटचाल करीत असल्याने लवकरच धरणातून विसर्ग केला जाऊ शकतो. धरणाच्या पाणीसाठ्यामुळे मराठवाड्याची चिंता मिटल्याचे चित्र आहे.