Join us

Jayakwadi Dam : आतापर्यंत नाशिकहून 34 टीएमसी पाणी सोडले, जायकवाडी किती भरलं? 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2024 1:35 PM

Jayakwadi Dam : नाशिक आणि अहमदनगरमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग झाला असल्याने आता जायकवाडीला पाणी सोडण्याची गरज राहिलेली नाही. 

Jayakwadi Dam :  गेल्या काही वर्षांपासून मराठवाड्यातील जायकवाडी धरणात (Jayakwadi Dam) पाणी सोडण्यावरून संघर्ष होत असून, गेल्या वर्षी नाशिकमधील धरणांमधून पाणी सोडण्यावरून बराच वाद निर्माण झाला होता, मात्र, आता नाशिक आणि अहमदनगरमध्ये चांगला पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात जायकवाडी धरणासाठी विसर्ग झाला असून, आता हे धरण ८२ टक्के भरले आहे. त्यामुळे गतवर्षीप्रमाणे ऐन उन्हाळ्यात नाशिकच्या धरणांमधून पाणी सोडण्याची गरज राहिलेली नाही. 

२०१६ मध्ये उच्च न्यायालयाने समन्यायी पाणी वाटपाचे धोरण अवलंबल्याने नाशिक (Nashik) आणि नगरमधून जायकवाडीसाठी पाणी सोडावे लागते. या आधी नाशिकमधून अहमदनगर येथे पाणी सोडण्यावरून वाद होता. मात्र, मेंढगिरी समितीचा अहवाल आणि उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जायकवाडी धरणाचा साठा ६५ टक्के न झाल्यास वरील भागातून म्हणजेच नाशिक आणि अहमदनगर या धरणे असलेल्या भागातून पाणी सोडावे लागते. त्यामुळे आता नाशिक, नगर विरुद्ध मराठवाडा असा संघर्ष उभा राहतो. 

विशेषतः नाशिक जिल्ह्यातच पुरेसा पाऊस झाला नसल्यास आणि नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये पुरेसा साठा नसल्यास मराठवाड्यासाठी पाण्याचा विसर्ग करण्यास विरोध होतो. गेल्या वर्षी नाशिक जिल्ह्यात मुळातच पाऊस कमी झाला होता. त्यामुळे पाणी सोडण्यास विरोध झाला होता, तसेच उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्या होत्या. दरम्यान, यानंतरही पाणी सोडण्यास स्थगिती न मिळाल्याने पाण्याचा विसर्ग करावा लागला होता. 

मुळा, प्रवरा, गंगापूर (Gangapur), गोदावरी-दारणा, पालखेड समूहातील २२ धरणांमधून ८.९९ टीएमसी पाणी जायकवाडीसाठी सोडावे लागले होते. मुसळधार पावसाने नाशिक, नगरमधील सर्व प्रमुख धरणे तुडुंब भरली. मोठ्या प्रमाणात अतिरिक्त पाणी सोडावे लागले. याचा लाभ जायकवाडीतील जलसाठा उंचावण्यास झाला. गेल्या बुधवारी जायकवाडी धरणात ५०.३० टीएमसी म्हणजे ६५.६१ टक्के जलसाठा झाला. त्यामुळे नाशिक, नगरमधून आता पाणी सोडावे लागण्याचा प्रश्न उरलेला नाही.

२१.६ टीएमसी पाण्याचा विसर्ग जायकवाडीकडे

नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून आतापर्यंत ३४ हजार सहा दशलक्ष घनफूट म्हणजेच ३४ टीएमसी आणि अहमदनगर जिल्ह्यातील धरणांमधून २१ हजार ६०० दशलक्ष घनफूट म्हणजेच २१.६ टीएमसी पाण्याचा विसर्ग जायकवाडीकडे झाला आहे. यामुळे जायकवाडी ८२ टक्के भरले आहे. सह्याद्री घाटमाथ्यावरील पावसाने जायकवाडीचा जिवंत जलसाठा अपेक्षेआधीच ६५ टक्के झाला असल्याचे जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

यंदा तशी वेळ येणार नाही, मात्र.... 

उच्च न्यायालयाने २०१६ मध्ये दिलेल्या आदेशानुसार समन्यायी तत्त्वानुसार जायकवाडी धरणात ६५ टक्के साठा झाला नाही तर नाशिक आणि नगरसारख्या वरील धरणांतून पाणी सोडावे लागते. यंदा तशी वेळ येणार नाही, मात्र, मराठवाड्यातील नागरिकांनी पाणी जपून वापरले पाहिजे. मृत साठा तर वापरूच नये, म्हणजे अडचण येणार नाही. गोदावरी हे तुटीचे खोरे असल्याने भविष्यात नाशिकसह मराठवाड्याचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी उल्हास आणि वैतरणा खोऱ्यातून पाण्यासाठी नदीजोड प्रकल्प राबवावा, म्हणजे अडचण येणार नाही. - राजेंद्र जाधव, संस्थापक अध्यक्ष, जलचिंतन  

टॅग्स :जायकवाडी धरणगंगापूर धरणनाशिकहवामान