छत्रपती संभाजीनगर : चालू महिन्यात विक्रमी जलसाठा होऊन जायकवाडी धरण (Jayakwadi Dam) ८७ टक्क्यांवर पोहोचले आहे. त्यामुळे नाशिक - अहमदनगर मधून पाणी सोडण्याची गरज नसल्याचे देखील बोललं जात आहे. त्यामुळे यंदा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आनंदाचा वातावरण आहे. मात्र धरण परिसरात असलेल्या शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.
जायकवाडी प्रकल्पाचा जलसाठा ८७ टक्क्यांवर गेला आहे. पुढील काही दिवसांत हा प्रकल्प शंभर टक्के भरण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. प्रकल्प ८० टक्के भरल्यानंतर प्रकल्पाशेजारील पैठण आणि गंगापूर तालुक्यांतील शेतातील पिकांमध्ये धरणाचे पाणी शिरण्यास सुरुवात होते आणि पुढील सहा महिने हे पाणी शेतात राहते. याचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसतो.
यंदाही अशीच परिस्थिती निर्माण झाल्याने शेतात पाणी शिरल्यास तेथेच जलसमाधी घेण्याचा इशारा शेतकऱ्यांनी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालकांना निवेदनाद्वारे दिला आहे. जायकवाडीतील जलसाठ्चामुळे मराठवाड्यातील सिंचन, उद्योग आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला असला तरी, प्रकल्पाच्या भूसंपादन क्षेत्राबाहेरील जमीन मालकांमध्ये या पाण्याची भीती निर्माण झाली आहे.
पाटबंधारे विभागाला निवेदन
शासनाने आमच्या जमिनी संपादित कराव्यात आणि एकरी तीन लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी यापूर्वीही केली होती. मात्र, यावर निर्णय झाला नाही. यंदाही अशीच परिस्थिती निर्माण झाल्याने प्रकल्पाशेजारील गंगापूर, पैठण तालुक्यांतील शेतकऱ्यांनी नुकतीच गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालकांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. जायकवाडी प्रकल्पाचे पाणी आमच्या जमिनीत येऊ देऊ नका, पाणी पिकांत शिरल्यास आम्ही तेथेच जलसमाधी घेऊ, असा इशारा दिला.