Join us

Kikulogy : किकुलॉजी : ​​​​​​​मान्सून पॅटर्न बदल आणि ढगफुटी, महापूर यांचा घनिष्ठ संबंध, जाणून घ्या सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2024 6:01 PM

(किकुलॉजी : भाग ३०) : मान्सूनचा पॅटर्न बदलत आहे, त्याचे परिणाम दिसू लागले आहेत. शेतकरी बांधवांनी सजग व्हावे यासाठीचे हे सदर!

मान्सून पॅटर्न बदल आणि ढगफुटी, महापूर यांचा घनिष्ठ संबंध आहे. आपत्ती येण्यापूर्वीच लोक सजग झाल्यास फार मोठी प्राण व वित्तहानी टाळता येते. 

 

यंदा २०२४ मध्ये सलग चार – पाच दिवस ढगफुटी होत जोरदार पावसाने कृष्णा, वारणा व पंचगंगा नदीला महापूर आला. एकाच वेळी धरणातून विसर्ग सुरू झाल्यामुळे नदीपात्रात विसर्ग हे खरंतर महापूराचे मुख्य कारण होय.‌ मानवी चुकांमुळे‌ सांगली, नृसिंहवाडी, कोल्हापूर जलमय झाले आहे. मुंबई‌च्या पावसाने पुण्यात किंवा पुण्यात झालेल्या पावसाने मुंबईत पूर आला असे म्हणणे जसे हास्यास्पद ठरते. तसेच १९७७ मध्ये बांधलेल्या अलमट्टी धरणामुळे कृष्णेच्या पाण्याचा फुगवटा म्हणजे बॅक वॉटर यामुळे शेकडो किलोमीटरच्या लांब अंतरापर्यंत सांगली, कोल्हापुरात पूर येतो हे अशास्त्रीय आहे. संथ वाहणारी कृष्णानदी, नदीपात्रातील अतिक्रमण होत झालेली बांधकामे,  सांगलीपासून अलमट्टीपर्यंत पाणी वाहण्यासाठी खालून जागा न ठेवता उभारलेले चारशेपेक्षा जास्त लहान मोठे पूल, बंधारे, रेल्वे पूल हे लहान रस्ते व महागार्ग हे अनैसर्गिक घटक पूर आणण्यासाठी कारणीभुत ठरणारे आहेत.

सांगलीला १८५३, १८५६, १८६१, २००५ आणि २०१४, २०१९ असा महापुरांचा फटका बसला आहे. मात्र अलमट्टी धरणातून होणाऱ्या विसर्गाकडे बोट दाखवून जनतेची दिशाभुल करण्यापेक्षा जबाबदारी घेत जनहितासाठी सम्नवयाने ठोस निर्णय राबवित जलव्यवस्थापन हे एडव्हान्सड इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजीने शक्य आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, पीएलसी स्काडा, एक्स बॅंड डॉप्लर रडार नेटवर्क, सुपर कॉम्प्युटर आदींचा वापर करीत जनतेच्या मोबाईलवर रियल टाईम माहिती व अलर्ट देत नुकसान तसेच संभ्रम टाळणे शक्य आहे. राजकीयदृष्ट्या यासाठी सुयोग्य धोरण राजकीय नेते, प्रशासनाने गांभीर्याने राबविणे गरजेचे आहे.

कृष्णा खोऱ्यात अनेक ठिकाणी ढगफुटी म्हणजे ताशी १०० मिलीमीटराचा पाऊस झाला आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा याभागात किमान ३३ महत्त्वाची धरणे आहेत. मागील आकडेवारी पाहिली तर लक्षात येते की १०५.२६ टीएमसी क्षमतेच्या एकटय़ा कोयना धरणाचा विचार जरी केला तरी ५ व ६ ऑगस्ट २०२० रोजी अनुक्रमे येथे २४७ मिलीमिटर व २०२ मिलीमिटर पाऊस झाल्याने या दोन दिवसात तब्बल १०.८८ टक्क्यांनी वाढ झाली. तर १४ ते १६ ऑगस्ट २०२० या तीन दिवसांत अनुक्रमे ११२ मिलीमिटर, १३६ मिलीमिटर व १८२ मिलीमिटर पाऊस झाल्याने तब्बल ११.०४ टक्कांनी वाढ धरणातील पाणी साठ्यात झाली होती. 

आज दक्षिण पश्चिम महाराष्ट्रात पूरस्थिती निर्माण झाली आहे. मात्र वर्ल्ड बॅंकेकडून ३५०० कोटी आलेला निधी खर्च झाल्यानंतर महाराष्ट्रात महापूर येणारच नाही असा जनतेला भरवसा वाटतो आहे का? या प्रश्नाचे उत्तर शोधणे गरजेचे आहे. महापूर आल्यानंतर मदतकार्य करण्यापेक्षा तो येऊच नये, यासाठी 'प्री डिजास्टर मॅनेजमेंट' करणे सुयोग्य आहे. याच विचाराने आणि याच उद्देशाने आजही प्रयत्नशील असून आपल्या अनुभव व हवामान अभ्यासााच्या आधारे ४ ऑक्टोबर २०१० ची पाषाण पुणे येथील ढगफुटी (१८२ मिलीमिटर पाऊस ९० मिनिटात) प्रेडिक्ट केली होती. ४ सप्टेंबर २०१० रोजी "महाराष्ट्रात यंदाच का होतेय ढगफुटी?" हा लेख जसा प्रकाशित करून जागृकता निर्माण केली. तसेच २ ऑक्टोबर २०१० रोजी "एनडीए परिसरातील ढगफुटी कशी घडली" याबाबतचे शास्त्रीय विश्लेषण आणि २ मार्च २०१४ रोजी "गारांच्या हिटलिस्टवर महाराष्ट्र!" यालेखाद्वारे गारपीटीने महाराष्ट्रातील २९ जिल्ह्यात २० हजार कोटीचे नुकसान होण्याआधी अलर्ट देण्यात आला होता. 

महापूर, अन्नसुरक्षितता आणि अर्थव्यवस्था

ढगफुटी व महापूर आदींमुळे सार्वजनिक मालमत्ता व शेतीची हानी केवळ देशाच्याच नव्हे तर जागतिक अर्थव्यवस्थेवर देखील विपरीत परिणाम घडविते. अन्नसुरक्षितता आणि अर्थव्यवस्था धोक्यात येते व महागाई वाढते. परीणामी त्याची किंमत आपल्यापैकी प्रत्येकालाच प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मोजावी लागते, याची जाणीव आपल्या सर्वांनाच आहे, ही जमेची बाजू होय.

महापूरात मृत्यूचे प्रमाण 

हवामान बदल आणि महापूर यांचे देखील एकमेकांशी नाते आहे. आपत्तींमुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये जगात सर्वाधिक मृत्यू हे महापुरामुळे होतात. दक्षिण आशिया आणि पूर्व आशियात पूर मृत्यूची संख्या सर्वाधिक आहे. आर्थिक सहकार आणि विकास संघटने (ओइसीडी) च्या म्हणण्यानुसार, जगभरात दरवर्षी पुरामुळे ४० अब्ज डॉलर्सहून अधिक नुकसान होते. जागतिक हवामान संघटनेच्या (डब्ल्यूएमओ) माहिती नुसार ढगफुटीमुळे जगभरात ८५ टक्के महापूराच्या घटना घडतात, यात दरवर्षी किमान पाच हजार लोक मृत्युमुखी पडतात. युनायटेड नेशन्स डेेव्हलपमेंट प्रोग्राम (यूएनडीपी) च्या अहवालानुसार जगातील पहिल्या दहा आपत्कालीन धोकादायक देशात भारताचा समावेश होतो. भारतातील किमान १२ टक्के भूखंड हा 'ढगफुटी प्रवण पूरक्षेत्र' आहे. 

जागतिक हवामान संघटनेने (डब्ल्यूएमओ) ने मोठा निधी देत ढगफुटी व त्यामुळे निर्माण होणारे पूर याबाबत 'अलर्ट' देण्याची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी 'नोडल एजन्सी' या नात्याने भारताकडे दिलेली आहे. यासाठी केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालय गेल्या एक वर्षांपासून भारतीय हवामानशास्त्र विभाग (आयएमडी) च्या भरवशावर 'कार्यक्षम' आहे. आयएमडीने 'फ्लॅशफ्लड (ढगफुटी) निर्देशन यंत्रणा देखील जागोजागी (एफएफजीएस)' उभारल्या आहेत. भारत केवळ आपल्या देशातील १३८ कोटी जनतेलाच नव्हे तर आशिया खंडातील विविध देशांत होणाऱ्या  'ढगफुटीं'ची सहा तास आगाऊ ढगफुटीच्या सुचना देत आहे. लाखो करोडो लोकांचे ढगफुटी व महापूरापासून प्राण वाचवित आहे, हे विशेष! 

मान्सून पॅटर्न बदल

हवामान आणि आपले जीवन यांचा घनिष्ठ संबंध आहे. किमान गेल्या २० वर्षांपेक्षा अधिक काळापासून मान्सूनचा पॅटर्न बदलत आला आहे. यात लाॅकडाउनच नव्हे तर भविष्यात देखील मोठे बदल व आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे.  अनेक वर्षांपासूनच्या प्रयत्नांना यश म्हणजे ३० सप्टेंबर २०१९ रोजी पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव एम. राजीवन यांनी देखील जाहिरपणे मान्सून पॅटर्न बदल झाल्याचे आता अधिकृतरीत्या मान्य केले आहे. 

साधारणतः १५ ऑगस्ट २०२० च्या सुमारास निंबोस्ट्रेटस ढगांची निर्मिती होत महाराष्ट्रात मान्सूनची सुरुवात झाली आहे, त्याआधी मान्सूनपूर्व क्युमोलोनिंबस ढगांची निर्मिती होत विजांचा कडकडाट सुरू होता. परिणामी यंदा कदाचित १५ डिसेंबर किंवा त्यानंतरही पावसाचा सामना करावा लागू शकतो, यावर अधिक संशोधन सुरु आहे. मात्र भारत हवामान विभाग (आयएमडी) च्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रात मान्सून १ जूनला मान्सून केरळमध्ये व ७ जूनला महाराष्ट्रात दाखल झाला होता, तर ३० सप्टेंबरला मान्सून संपतो. १ जून २०२० ते १७ ऑगस्ट २०२० ची आकडेवारी पाहिली तरी सरासरीपेक्षा किमान १६ टक्के जास्त पाऊस महाराष्ट्रात तर ३६ टक्के जास्त पाऊस एकट्या मराठवाड्यात व ४ टक्के पाऊस भारतात वाढलेला आहे. ६ ऑगस्ट २०२० रोजी मुंबईत अवघ्या चार तासात ३०० मिलीमिटर पेक्षा जास्त पाऊस झाल्याची माहिती मुंबई महापालिका आयुक्तांनी दिली होती. १९७४ ऑगस्ट महिन्यातील २६१ मिलीमिटरचया तुलनेत या दिवशी ३३२ मिलीमिटर पावसाची मुुंबईतलीही नोंद रेकॉर्ड ब्रेक आहे. पावसाळा संपायला अजूनही किमान एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी बाकी आहे, अशावेळी महाराष्ट्रात पडलाच तर तो केवळ ओला दुष्काळ असेल.

मान्सूनचा पॅटर्न बदलल्याने ढगफुटीसारखे 'एक्सट्रिम इव्हेंट' महाराष्ट्रासह देशभर वाढले आहेत आणि अजून वाढतील. हवामान अभ्यासक म्हणून २०१९ च्या ऑगस्ट महिन्यातच १५ नोव्हेंबर २०१९ पर्यंत पाऊस लांबणार असा अलर्ट दिलेला होता. पण तरीही २०१९ मध्ये ९२ लाखापेक्षा अधिक हेक्टर शेतीचे नुकसान रोखता आले नाही, ही वस्तुस्थिती आहे. 

महापूर आणि सुयोग्य कृती

केंद्र सरकारच्या जल आयोगाच्या निर्देशानुसार धरणातील पाणीसाठा ३१ जुलैपर्यंत ५० टक्के, ऑगस्ट अखेर ७५ टक्के आणि १५ सप्टेंबर नंतर १०० टक्के असावा. मात्र महाराष्ट्रात कोयनेसह बहुतेक धरणे ही नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त, तर काही शंभर टक्के भरलीत, जे सर्रासपणे नियमांची पायमल्ली होऊ शकते, याकडे लक्ष दिले जाईल. ढगफुटी म्हणजे १०० मिलीमिटर किंवा त्यापेक्षा जास्त दराचा पाऊस होय. ढगफुटीमुळे लाखो लीटर पाणी धरणाच्या कॅचमेंट एरिया मध्ये गोळा होते. तसेच तुडुंब भरलेल्या धरणातील पाणी अचानक सोडावे लागल्याने महापूर येतो व अतोनात नुकसान होते.

महापूर रोखण्यासाठी नदी पात्रातील गाळ काढून खोली वाढविणे, हा अत्यंत महत्वाचा उपाय होय.‌ पूराच्या पाण्यापासून सुरक्षित राहण्यासाठी सारासार विचाराने सावधगिरी बाळगत प्रत्येक व्यक्तीने आपापल्या जबाबदारीवर केलेली सुयोग्य कृती महत्वाची आहे. मात्र असे असले तरी, दुष्काळ पडला तर काय होईल अशी शंका घेत काही अधिकारी धरणातील पाणी सोडण्यास विरोध करतात, मात्र मान्सून पॅटर्न बदलल्याने वाढलेल्या पावसाचा धोका प्रशासनाला माहिती आहे. म्हणून प्रशासन धरणातील पाण्याचा विसर्ग तातडीने व सुयोग्य पद्धतीने करेल आणि मनुष्य, पशू अशी प्राणहानी, वित्तहानी व शेतीचे व पर्यावरण नुकसान मानवी चुकींमुळे होऊ देणार नाही अशी आशा आहे. यावर्षी नियोजनबद्ध व वेळोवेळी विसर्गामुळे पुन्हा महापूर येणार नाही हा विश्वास वाटतो.

(लेखक भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालया अंतर्गत येणाऱ्या पुणे येथील इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ ट्रॉपिकल मेटियीरोलाॅजी (आयआयटीएम) चे माजी हवामान शास्त्रज्ञ आहेत, शेतकर्यांसाठी गेल्या १८ वर्षापासून चालवित असलेल्या 'अंदाज नव्हे माहिती!' या विनामोबदला तसेच विनाअनुदानित जनहित राष्ट्रीय हवामान माहिती व अलर्ट सेवेचे प्रणेते आहेत.)

प्रा. किरणकुमार जोहरेआंतरराष्ट्रीय हवामान संशोधक,ढगफुटी तज्ज्ञ, कृषी व तंत्रज्ञान अभ्यासक, नाशिक ४२२००९संपर्क : 9168981939, 9970368009, ईमेल: kirankumarjohare2022@gmail.com

टॅग्स :हवामानमोसमी पाऊसमोसमी पावसाचा अंदाजपाऊसशेती क्षेत्रपूर