Join us

Weather Report : मार्चचे शेवटचे पाच दिवस उष्णतेचे, जाणून घ्या हवामान अंदाज 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2024 5:41 PM

सद्यस्थितीत सकाळी नऊ वाजेपासून ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत उन्हाचा कडाका जाणवत आहे.

सर्वदूर उकाडा वाढला असून तापमानात कमालीची वाढ झाल्याचे जाणवते आहे. सकाळी नऊ वाजेपासून ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत उन्हाचा कडाका जाणवत आहे. त्यानुसार पुढील पाच दिवस पावसाची शक्यता नसणार आहे. कमाल तापमान 38 अंश सेल्सिअस ते 40 अंश सेल्सिअस तापमान असणार आहे. तर किमान तापमान १९-२१ डिग्री सें. दरम्यान राहण्याची शक्यता आहे. 

सद्यस्थितीत तापमान वाढत असल्याने पाणीपातळी देखील घटत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईची समस्या जाणवू लागली आहे. शिवाय शेतपिकांवर देखील तापमानाचा परिणाम होत आहे. पिकांना पाणी नसल्याने उत्पादन घटण्याची भीती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर मार्च शेवटच्या पाच दिवस हवामान कसे असेल याबाबत हवामान अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पुढील पाच दिवसाचा अंदाज लक्षात घेता हवामान कोरडे व उष्ण राहण्याची शक्यता आहे. आकाश पुढील तीन दिवस निरभ्र राहील व उर्वरित दिवस अंशतः ढगाळ राहील. कमाल तापमान ३८-४० डिग्री सें. व किमान तापमान १९-२१ डिग्री सें. दरम्यान राहण्याची शक्यता आहे तसेच वा-याचा वेग ११-१२ कि.मी/तास या दरम्यान राहण्याची शक्यता असल्याचा हवामान अंदाज विभागीय कृषी संशोधन केंद्र इगतपुरी यांनी व्यक्त केला आहे. 

कृषिहवामान सल्ला

वाढते तापमान व पाण्याच्या अभावाखाली शेतकर्यांना सल्ला देण्यात येतो कि फळ व भाजीपाला पिकांमध्ये मल्चिंगचा वापर करून बाष्पीभवनाच वेग कमी करावा. वाढत्या तापमानाचा अंदाज लक्षात घेता सल्ला देण्यात येतो कि पशुधन, शेळी/मेंढी , कुक्कुट तसेच स्वतःचे उन्हापासून संरक्षण करावे. तापमानाचा अंदाज लक्षात घेता उन्हाळी पिकांना पाणी द्यावे. उशिरा पेरलेल्या रबी ज्वारी पिकाची काढणी व मळणीची कामे पूर्ण करावी. खरड छाटणीच्या पंधरा दिवस आधी माती आणि पाणी परीक्षण करून घ्यावे. उशिरा पेरलेल्या रबी मका पिकाची कणसे खुडनी व उफनणीची कामे पूर्ण करावी. गव्हाच्या काही जातींचे (उदा. एनआय.५४३९, फुले त्र्यंबक) दाणे पीक पक्‍व झाल्यानंतर शेतात झडतात व नुकसान होते. तसे होऊ नये म्हणून पीक पक्‍व होण्याच्या २ ते ३ दिवस आधी गव्हाची कापणी करावी. उन्हात वाळवल्यानंतर मका पिकाच्या कणसाच्या वरील आवरण काढून मका सोलणी यंत्राच्या (म.फु.कृ.वि. राहुरीद्वारे विकसित सुधारित अवजार) साह्याने कणसातील दाणे वेगळे करावेत. 

 

पीक व्यवस्थापनापासून नियोजनापर्यंत, शेतीच्या सर्व अपडेट्ससाठी लोकमत ऍग्रोच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील व्हा...

टॅग्स :शेती