Join us

Water Discharged : हरणबारी, केळझर धरणातून अखेरचे आवर्तन, 'या' गावांना मिळणार पाणी 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2024 10:46 AM

हरणबारी, केळझर धरणातून पिण्यासाठी पाण्याचे शेवटचे आवर्तन सोडण्याचे आदेश जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिले.

नाशिक :बागलाण तालुक्यातील हरणबारी, केळझर धरणातून पिण्यासाठी पाण्याचे शेवटचे आवर्तन सोडण्याचे आदेश जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी जलसंपदा विभागाला दिले आहेत. आदेशानुसार केळझर धरणातून 10 मे रोजी पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले तर हरणबारी धरणातून आज 12 मे रोजी नदीपात्रात सोडण्यात आले आहे. यामुळे जवळपास 80 गावांना दिलासा मिळून पाणी टंचाई दूर होणार आहे.

बागलाण तालुक्यातील हरणबारी, केळझर धरणातील पाण्याचे दोन आवर्तन रब्बीसाठी दिले होते. उर्वरित पाणीसाठा हा पिण्यासाठी आरक्षित केला होता. दोन आठवड्यांपासून मोसम आणि आरम नदीकाठच्या 80 पाणीपुरवठा योजनांच्या विहिरींनी तळ गाठल्याने भीषण टंचाई निर्माण होऊन भटकंतीची वेळ आली होती. हरणबारी धरणात 399 दलघफू साठा शिल्लक असून रविवारी 500 क्युसेकने मोसमपात्रात पाणी सोडण्यात आले. ते मालेगाव तालुक्यातील वैतागवाडी बंधाऱ्याापर्यंत पोहोचेल, याप्रमाणे नियोजन केले आहे.

या गावांना दिलासा..... 

या आवर्तनामुळे मुल्हेर, अंतापूर, ताहाराबाद, करंजाड, पिंगळवाडे, भुवाणे, सोमपूर, भडाणे, तांदुळवाडी. जायखेडा, लाडूद, निताने, वाडीपिसोळ, एकलहरे, मॅडीपाडे, ब्राम्हणपाडे, आसखेडा, द्याने, उत्राणे, नामपूर, खिरमानी, अंबासन, मोराणे, काकडगाव, बिजोरसे, खामलोण, राजापूरपांडे, वाघळे, नळकस यांच्यासह मालेगावातील तीस ते पस्तीस गावे तर आरम काठचे करंजखखेड, भावनगर, साकोडे, वड्याचेपाडे, बुंधाटे, डांगसौंदाणे, दहिंदुले, निकवेल, कांधाने, चौंधाने, निरपूर, खमताने. मुंजवाड, मळगाव, मोरेनगर, आराई, सटाणा या गावांना दिलासा मिळणार आहे.

ग्रामपंचयातीकडून मागणीचे ठराव 

संबंधित ग्रामपंचायतींनी पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सोडण्याची मागणी करणारे ठराव सादर केल्याने जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केळझर, हरणबारी धरणातून अनुक्रमे 10 आणि 12 मे रोजी पाणी सोडण्याचे आदेश जलसंपदा विभागाला दिले होते. त्यानुसार शुक्रवारी केळझर धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. तर 12 मे रोजी हरणबारी धरणातून पाणी सोडण्यात येणार आहे.

टॅग्स :शेतीपाणीधरणनाशिकशेती क्षेत्र