Maharashtra Rain Update : अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाने (Rain) कमबॅक केले आहे. २० सप्टेंबरपासून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाला सुरवात झाली आहे. तर राज्यातील इतर जिल्ह्यातील आजपासून पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हा परतीचा पाऊस असून पुढील सात दिवस संततधार राहिल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे, यावर जेष्ठ निवृत्त हवामान तज्ञ यांनी सविस्तर माहिती दिली आहे.
आजपासून राज्यातील अनेक भागात जोरदार पावसाचा (Maharashtra Rain Update) इशारा देण्यात आला आहे. आज २३ सप्टेंबरपासून ते काही जिल्ह्यात २६ सप्टेंबरपर्यंत जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. याबाबत एका शेतकऱ्याने २०१९ मधील २४ सप्टेंबरपासूनच्या पावसाचा संदर्भ देत पुढील नऊ दिवस पाऊस (Heavy Rain) कायम झाल्याचे त्यांनी सांगितले. म्हणजेच पाऊस झड स्वरूपात लागून राहील की वळीव सारखा ययेऊन उघडून जाईल, यावर उत्तर देताना खुळे यांनी या दिवसात झड लागत नसल्याचे सांगितले.
यावर स्पष्टीकरण देतांना ते म्हणाले की, अति टोकाचे १०२ वर्षानंतर २०१९ सप्टेंबरच्या शेवटच्या १० दिवसात, परतीचा पाऊस फिरण्यापूर्वी बळकट आयओडी व १० दिवस एकाच ठिकाणी खिळलेल्या डिप्रेशनमुळे तयार झालेल्या वातावरणातून तो पाऊस होता. तो झडीचा नव्हे तर उत्तरा नक्षत्रातील वळीव स्वरूपातील गडगडाटीचा पाऊस होता. बिहार, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश काहीसा गुजरातमध्ये जोरदार पाऊस झाला. अनेक ठिकाणी महापुराची परिस्थिती होती. त्यामुळे त्याचा झडीशी संबंध लावू नये. जसा भूकंप दरवर्षी होत नाही, तसे प्रत्येक सप्टेंबर महिन्यातील पावसाशी त्याचा संबंध लावू नये. असे वातावरण क्वचितच एखाद्या वर्षी घडून येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पुढील तीन दिवस पाऊस
दोन दिवसांपासून सुरू झालेला पाऊस पुढील दोन ते तीन दिवस राहण्याची शक्यता आहे. उद्या कोकणातील रायगड आणि मराठवाड्यातील परभणी, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर २५ सप्टेंबर रोजी पुणे, ठाणे, पालघर या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. २६ सप्टेंबर रोजी केवळ नाशिक जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट असून बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.