Maharashtra Rain Update : मागील आठवडाभरापासून पावसाने (Rain) सर्वदूर चांगलीच हजेरी लावली आहे. आज सकाळपासून काहीशी उघडीप दिली आहे. अनेक भागात संततधार पाऊस सुरूच आहे. तर काही ठिकाणी उन्हे दिसू लागली आहेत. पुढील काही दिवस पावसाचा अंदाज कसा असेल, हे जाणून घेऊयात..
उन्हाची ताप
काल सोमवार दि.२६ ऑगस्टला बुलढाणा व छत्रपती संभाजीनगर वगळता संपूर्ण विदर्भ व मराठवाड्यातील दुपारी ३ चे कमाल तापमान हे ३० तर उर्वरित महाराष्ट्राचे तापमान २८ डिग्री से. ग्रेड होते.
खान्देश व नाशिक वगळता ही तापमाने सरासरीच्या आसपास तर खान्देश व नाशिक अशा ४ जिल्ह्यात हे तापमान सरासरीपेक्षा ३ डिग्रीने खालावलेले होते. संपूर्ण मराठवाडा, खान्देश तसेंच नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर अशा १८ जिल्ह्यात दुपारी ३ चे हे कमाल तापमान वाढून हळूहळू उन्हाची ताप जाणवू शकते.
पाऊस
आज मंगळवार दि. २७ ते शुक्रवार दि. ३० ऑगस्टपर्यंतच्या चार दिवसात, नांदेड वगळता मराठवाडा, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर अशा १३ जिल्ह्यात मध्यम तर मुंबईसह संपूर्ण कोकण आणि विदर्भ खान्देश तसेच नाशिक व नांदेड अशा २३ जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता कायम आहे.
धरणातील जलविसर्ग
नाशिक पुणे सातारा कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावरील धरणांतून होत असलेला जलविसर्ग मात्र कायम टिकून असुन संबंधित नद्यांच्या काठावरील पूर-परिस्थिती जैसे-थे राहू शकते.
पुन्हा पाऊस -
शनिवार दि.३१ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर दरम्यान मराठवाडा वगळता उर्वरित महाराष्ट्र मध्यम तर मराठवाड्यात किरकोळ पावसाची शक्यता जाणवते.
- माणिकराव खुळे
Meteorologist (Retd)
IMD Pune.