Join us

Maharashtra Rain Update : सध्याचा पाऊस कशामुळे अन् ऑगस्ट महिन्यात पाऊस कसा असेल? जाणून घ्या सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2024 6:44 PM

Maharashtra Rain Update : आज व उद्याही महाराष्ट्रात (Maharashtra Rain) भाग बदलत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता ही आहेच. तर ऑगस्टमध्ये..

Maharashtra Rain Update : संपूर्ण ऑगस्ट महिन्यातील पावसाची स्थिती अ) सरासरीपेक्षा अधिक(१०६ टक्के व अधिक) पावसाच्या शक्यतेतील ९ जिल्हे- पुणे, सातारा. कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, धाराशिव, लातूर, नागपूर.         ब) सरासरी इतक्या (९६ ते १०४ टक्के) पावसाच्या शक्यतेतील ८ जिल्हे- नंदुरबार, जळगांव, जालना, बीड, नांदेड, परभणी, जालना, भंडारा. क) सरासरीपेक्षा कमी (९० ते ९५ टक्के) पावसाच्या शक्यतेतील १९ जिल्हे - धुळे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, सांगली तसेच संपूर्ण विदर्भ(भंडारा व नागपूर वगळता) आणि कोकणातील पालघर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड. 

ऑगस्टमधील धरणांची स्थिती                 ऑगस्टमध्ये पाऊस पुन्हा घाटमाथ्यावरच अधिक कोसळणार आहे. त्यामुळे पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांमधील सह्याद्रीच्या कुशीतील सर्व धरणे भरून ओसंडतील. गोदावरी खोऱ्यातील यापुढील सर्व जल स्रोतांचे प्रवाह (रन-ऑफ रेन वॉटर) हे आता जायकवाडीच्या उदरातच विसावतील. त्यामुळे महाराष्ट्रातील जायकवाडीसह इतर सर्व मोठे जल-प्रकल्प लवकरच भरून नद्यांचे प्रवाह ही खळाळतील. 

  येत्या दोन दिवसातील पावसाची स्थिती            गेल्या तीन दिवसापासून मान्सूनच्या सक्रियतेनंतर आज व उद्याही (४ व ५ ऑगस्ट) महाराष्ट्रात भाग बदलत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता ही आहेच. आतापर्यंत ओढ दिलेल्या पर्जन्यच्छायेतील प्रदेशातही समाधानकारक पावसाची अपेक्षा करू या! मंगळवार दि. ६ ऑगस्टपासून मात्र कोकण व विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्रात पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता जाणवते. मुंबईसह संपूर्ण कोकणात पावसाचा जोर कायम टिकून राहण्याची आहे. 

सध्याच्या तीन दिवसातील पाऊस कशामुळे?      i) सध्या अरबी समुद्रात विशेषतः महाराष्ट्राच्या उत्तर किनारपट्टीवर सम हवेचा दाब जोडणाऱ्या प्रत्येक दोन सम-तल रेषा (आयसोबार्स) मधील कमी झालेल्या अंतरामुळे, हवेच्या दाबाचा ढाळ खोल झाला आहे. म्हणजेच प्रत्येक दोन आयसोबारमधील अंतर कमी होवून 'प्रेशर ग्रेडीएन्ट ' बळकट झाला आहे. परिणामी आपोआपच समुद्र सपाटीपासून दिड किमी. हवेच्या जाडीत सोमालिया जेटच्या पश्चिमी मान्सूनी वाऱ्यांचा वेग ताशी ३५ ते ७५ किमीपर्यंत वाढून कोकण किनारपट्टीवर आदळत आहेii) सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर असलेला वर स्पष्टीत बळकट प्रेशर ग्रेडीएन्टचा (उलटा) द्रोणीय आसही घाटमाथ्यावर पाऊस देत आहे. 

खरीप पिके      वर स्पष्टीत सरासरीपेक्षा कमी (९० ते ९५ टक्के) पावसाच्या शक्यतेतील महाराष्ट्रातील १९ जिल्ह्यात ऐन दाणा-भरणीत आलेल्या खरीप पिकांना ऑगस्ट मध्ये पावसाची ओढ बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु ह्या १९ जिल्ह्यातील कमी पावसाच्या शक्यतेतही पावसाचे वितरण जर समान झाले, म्हणजे पावसाळी दिवसाची संख्या ऑगस्ट मध्ये जर वाढली तर पिकांना दिलासा मिळू शकतो. विशेषतः नगर नाशिक, व छत्रपती संभाजीनगर अशा ३ जिल्ह्यात पावसाची परिस्थिती जैसे थेच राहण्याची शक्यता जाणवते. 

- माणिकराव खुळे,Meteorologist (Retd)IMD Pune.

टॅग्स :हवामानपाऊसमोसमी पाऊसमहाराष्ट्रशेती क्षेत्र