आजपासून आठवडाभर महाराष्ट्रात पावसाची स्थिती कशी असेल? गेल्या पाच दिवसात मान्सून ची सक्रियता चांगलीच जाणवली. आजपासून आठवडाभर म्हणजे मंगळवार दि. १३ ऑगस्टपर्यंत कोकण, विदर्भ, नाशिकसह खान्देश वगळता उर्वरित अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर व संपूर्ण मराठवाडा अशा १४ जिल्ह्यात तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते. परंतु i) नंदुरबार धुळे जळगांव नाशिक जिल्ह्यात मध्यम तर ii) विदर्भात जोरदार आणि iii) मुंबईसह कोकणात कोकणात अतिजोरदार पावसाची शक्यता मात्र आठडाभर जाणवते.
आता ऑगस्ट मधील महाराष्ट्रातील पावसाचे ठळक वैशिष्ठ्ये काय आहेत?
'ऑगस्ट अखेरीसच ला- निना डोकावणार!' ' ऑगस्ट मध्ये पाऊस सरासरीच्या कमीच राहणार ! 'नगर नाशिक, छ.सं.नगर मध्ये पावसाची परिस्थिती जैसे थे! ' 'ऑगस्ट मध्ये विदर्भात ही पावसाची ओढ कायम राहणार!' 'ऑगस्ट मध्ये पाऊस पुन्हा घाटमाथ्यावरच अधिक ' 'धरण क्षेत्रात पावसाचा जोर टिकून राहणार!' 'पुणे सातारा कोल्हापूर मधील धरणे ओसंडणार नद्या खळाळणार!' 'ना 'ला-निना' ना 'आयओडी', ऑगस्ट मध्ये पाऊस कमी.
आता ऑगस्ट महिन्यातील देशाबरोबर महाराष्ट्रातील पावसासाठीही 'ला-निना व आयओडी चा काय परिणाम जाणवेल.
ला- निना : ऑगस्ट महिन्याच्या अखेरीसच 'ला-निना डोकावणार आहे. त्यामुळे ऑगस्टमधील एन्सो तटस्थेतील पहिले ३ आठवडे पावसासाठी अटकाव करणारे नसले तरी.ही स्थिती अधिक जोरदार पावसासाठी पूरकही नाही.
'आयओडी' (भारत महासागरीय द्वि-ध्रुविता) - संपूर्ण ऑगस्ट व सप्टेंबर मधील दोन महिन्यात आयओडी तटस्थ राहणार आहे. त्यामुळे ऑगस्टमधील पावसासाठी अरबी समुद्र व बं. उपसागरातील पृष्ठभागीय पाण्याचे समान असणारी तापमानीय स्थिती पावसास अटकाव करणारी जरी नसली तरी महाराष्ट्रात सध्या अधिक पावसाची गरज असतांना ती पावसासाठी पूरकही जाणवत नाही.
ऑगस्टमधील तापमानाचा महाराष्ट्रातील पावसावर काय परिणाम जाणवेल?
कमाल तापमान - ऑगस्ट महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रात दुपारचे ३ वाजेचे कमाल तापमान हे ऑगस्ट मधील सरासरी कमाल तापमानापेक्षा पेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे. म्हणजे दिवसाचे तापमान अधिक म्हणून अधिक आर्द्तेची निर्मिती आणि त्यामुळेच केवळ काही भागातच ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता जाणवते.
किमान तापमान संपूर्ण महाराष्ट्रात ऑगस्ट महिन्यात पहाटे ५ चे किमान तापमान हे सरासरीपेक्षा अधिक असण्याची शक्यतेमुळे अधिक आहे. म्हणजेच ऑगस्ट महिन्यात काही पावसाळी भागाबरोबर काही भाग केवळ ढगाळच जाणवेल. एकूणच अश्या आभ्राच्छादित स्थितीतून किमान तापमानात वाढ जाणवणार आहे.
५-ऑगस्ट मध्ये पावसाचे खंड असतील काय?
जेंव्हा ऑगस्ट मध्ये महाराष्ट्र व मध्य भारतात पावसाचा खण्ड येतो तेंव्हा- i) संपूर्ण महाराष्ट्र, कर्नाटक, केरळाच्या कोकणातील पश्चिम किनारपट्टीवरील तसेच ii) आसामकडील पुर्वोत्तरातील ७ राज्ये आणि iii) हिमालयाच्या पायाथ्यातील गंगेच्या खोरे प्रदेशातील सिक्कीम, हिमालयीन पश्चिम बंगाल शिवाय iv) बिहार झारखंड व ता. नाडू व रायलसीमा भागात अधिक तीव्रतेने पाऊस होतो. ऑगस्ट महिन्यात वर स्पष्टीत भागात पावसाची तीव्रता पाहता, महाराष्ट्रात पावसाचे खंड पडण्याची शक्यता कमीच जाणवते.
महाराष्ट्रात सप्टेंबर मधील पाऊस कसा असेल? 'ला-निना' च्या उपस्थितीत सप्टेंबर महिन्यात नाशिक व नगर असे दोन जिल्हे वगळता महाराष्ट्रातील उर्वरित ३४ जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता जाणवते. नाशिक, नगर जिल्ह्यात मात्र मासिक सरासरीपेक्षा केवळ कमी पावसाची शक्यता आज तरी दिर्घपल्ल्याच्या अंदाजातील स्थितीनुसार जाणवते. अर्थात १ सप्टेंबरला दिल्या जाणाऱ्या सप्टेंबर महिन्याच्या मासिक अंदाजात यात अधिक स्पष्टता जाणवेल, असे वाटते.
- माणिकराव खुळे,Meteorologist (Retd)IMD Pune