Maharashtra Rain Update : आजपासून पुढील तीन दिवस कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर विदर्भात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. आज २९ ऑक्टोबर रोजी पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यात तर ३० आणि ३१ ऑक्टोबरला कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाडा आणि विदर्भातील बऱ्याच जिल्ह्यात हलक्या (Maharashtra Rain Update) स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
तसेच एक नोव्हेंबरला दक्षिण कोकण, गोवा, दक्षिण मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या दक्षिणेकडील बहुतांशी जिल्ह्यात मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह ३० ते ४० किलोमीटर वेगाच्या वादळी वाऱ्यांसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याने वरील सर्व ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आला आहे.
पुणे आणि आसपासच्या परिसरासाठी ३० ऑक्टोबर रोजी आकाश मुख्यता निरभ्र राहील, तर ३१ ऑक्टोबरला आकाश दुपारी किंवा संध्याकाळी अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. त्यानंतरच्या दोन दिवस आकाश अंशतः ढगाळ राहून दुपारी किंवा संध्याकाळी सामान्यतः ढगाळ बनून हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची २५ ते ५० टक्के शक्यता आहे.
नाशिक जिल्हयासाठी हवामान अंदाज
पुढील पाच दिवसाचा अंदाज लक्षात घेता दि. ३० व ३१ ऑक्टोबर २०२४ रोजी खूप हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच उर्वरित दिवस हवामान दिवसा उष्ण व कोरडे राहण्याची शक्यता आहे. आकाश पुढील पाच दिवस अंशतः ढगाळ राहील. कमाल तापमान ३१-३३ डिग्री सें. व किमान तापमान १८-२० डिग्री सें. दरम्यान राहण्याची शक्यता आहे तसेच वा-याचा वेग १-४ कि.मी/तास या दरम्यान राहण्याची शक्यता आहे